जानेफळ : चुकीच्या बियाणे निवडीमुळे शेतकऱ्यांची फसगत होऊन त्यांच्यावर अडचणीच्या काळात दुबार व तिबार पेरणीची वेळ येऊ नये, म्हणून महिन्याभरापूर्वीच शेतकरी बांधवांना खरिप हंगामाच्या पेरणीच्या दृष्टीने कृषी विभागाच्यावतीने बियाणे उगवण क्षमता चाचणी व बीज प्रक्रियाविषयी जानेफळ येथे मार्गदर्शन करण्यात आले.
सोयाबिन पिकाला यावर्षी चांगला भाव मिळाल्याने सोयाबीन पेरणीकडे यावेळी शेतकऱ्यांचा मोठा कल असणार आहे. त्यामुळे सोयाबीनच्या बियाण्यांची मोठी मागणी वाढून भावसुद्धा तडकणार आहेत. त्यामुळे तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मेहकर यांच्याकडून गाव पातळीवर तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून बियाणे उगवण क्षमता चाचणी व बीज प्रक्रियाविषयी जनजागृती सुरू करण्यात आली आहे.
येथील शेतकरी बबन अवचार, शेख शहाबुद्दीन, सुभाष वाळके, विजय केदारे, इत्यादी शेतकऱ्यांच्या घरी जावून कृषी सहाय्यक दुर्गादास राठोड, मंडल कृषी अधिकारी प्रवीण गाडेकर, कृषी पर्यवेक्षक दिलीप वायाळ, कृषिमित्र प्रभाकर लोखंडे व मधुकर काळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत मागीलवर्षी पावसामुळे सोयाबीन भिजल्याने बियाणे खराब झाले होते. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांकडे सोयाबीन बियाणे नसेल त्यांनी आत्ताच सोयाबीन बियाणे विकत घेऊन बियाण्याची उगवण क्षमता तपासणी करून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले. खरिपाच्या पेरणीच्या महिन्याभरापूर्वीच कृषी विभागाने सुरू केलेल्या या बियाणे उगवण क्षमता चाचणी व बीज प्रक्रियाविषयी मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.