बुलढाणा : जिल्ह्यात गत काही महिन्यांपासून अवैध गुटखा विक्री माेठ्या प्रमाणात सुरू आहे. याविषयी लाेकमतने वृत्त प्रकाशित केले हाेते. त्यानंतर पाेलिसांनी अवैध गुटखा विक्रेत्यावर कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. साेमवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गस्तीवर असताना ७ लाख रुपयांच्या गुटख्यासह १४ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.
बुलढाणा शहरात दाखल झालेल्या एका वाहनातून गुटख्याची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली़ या माहितीच्या आधारे पथकाने धाड टाकून मालवाहू वाहन क्रमांक एमएच २८ बीबी ३०६६ ची तपासणी केली. यामध्ये विविध कंपन्यांचा तब्बल सात लाख रुपयांचा गुटखा आढळला. पाेलिसांनी हा गुटखा व वाहन जप्त केले. तसेच आराेपी वैभव सुरेश डामरे, शुभम गजानन तासतोडे दोन्ही रा. जयभवानीचौक, चांदमारी फैल खामगाव जि. बुलढाणा यांच्यावर कारवाई केली.
पांढऱ्या, निळ्या रंगांच्या विविध पाेत्यांमध्ये गुटखा व सुगंधित पान मसाला, तसेच तंबाखू व इतर वस्तूची वाहतूक करण्यात येत हाेती. पाेलिसांनी तब्बल सात लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे़ या प्रकरणी बुलढाणा शहर पाेलिसांत दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़