डोणगाव परिसरात कोरोनाचा कहर : एकूण ५७ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 05:41 PM2020-08-07T17:41:53+5:302020-08-07T17:42:08+5:30
डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांर्तंत आतापर्यंत ५७ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: मेहकर तालुक्यातील डोणगाव परिसरात गत काही दिवसांपासून कोरोनाचा कहर सुरूच आहे. डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांर्तंत आतापर्यंत ५७ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कातील २९१ जणांना क्वारंटीन करून त्यांची तपासणी करण्यात आली आहे. ३२ जणांनी कोरोनावर मात केली असून २५ जण कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गंत डोणगाव, अंजनी बु, लोणी वगळी, नागापूर आणि मादानी येथे कोरोनाने शिरकाव केला आहे. कोरोना रु ग्ण आढळताच वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल गवई, डॉ.किशोर बिबे, डॉ.सुरेंद्र सरदार त्या गावात भेट देउन पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील लोकांना क्वारंटीन करण्यात आले आहे. परिसरात रुग्ण संख्या वाढत असले तरी ग्रामस्थांमध्ये गांभीर्य नसल्याचे चित्र आहे. फिजिकल डिस्टन्सींगचा फज्जा उडत असून मास्क न बांधता विनाकारण ग्रामस्थ फिरत असल्याने संसर्गाचा धोका वाढत असल्याचे चित्र आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत असला तरी पोलिस आणि महसूल विभागाचे नियंत्रण नसल्याने नियमांचे उल्लंघन होत आहे.
अकोल्यात दोघांचा मृत्यू
डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गंत येत असलेल्या मादाणी येथील ५२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे अकोला येथील सर्वोपचार रुग्णलयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच डोणगाव येथील ६५ वर्षीय व्यक्तीचाही अकोल्यातच मृत्यू झाला होता. आतापर्यंत डोणगाव परिसरात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही रुग्ण बाहेरील पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आले होते,अशी माहिती डॉ.अमोल गवई यांनी दिली. या दोन्ही रुग्णांच्या संपर्कात असलेले कुटुंबातील सदस्य, मित्र तसेच इतरांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.