डाेणगाव : परिसरात सध्या नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाचे काम सुरू आहे. त्यासाठी मुरमाची आवश्यकता असल्याने कंत्राटदार कंपनी शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन योग्य ती कागदपत्रे सादर करून गौण खनिज उत्खननाचे परवाने घेऊन गौण खनिज नेत आहे. परंतु गोहोगाव दांदडे येथील विजय जयवंतराव दांदडे यांच्या मालकीच्या शेतात कंत्राटदाराने कुठलीही परवानगी न घेता खाेदकाम केले. तसेच कंत्राटदाराने दिलेला धनादेश अद्यापपर्यंत वटला नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
गोहोगाव दांदडे येथील विजय जयवंतराव दांदडे यांच्या शेती गट क्रमांक ५२५ मधील ०.८१ हेक्टर मधील गौण खनिज रितेश शरद मेहरा याने जमीन विकत घेऊन १२ नाेव्हेंबर राेजी पाच लाख पन्नास हजार रुपयांचा धनादेश दिला. तसेच १५ नोव्हेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत कोणत्याही परवाना नसताना जमीन खोदून गौण खनिज नेले व तात्पुरता परवाना २८ जानेवारी २०२१ ला घेतला. परंतु दिलेला चेक न वटल्याने शेतकऱ्याची फसवणूक झाली असल्याने कंत्राटदारावर बेकायदेशीर उत्खनन करून गौण खनिजाचा वापर केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जिल्हा अधिकारी यांच्याकडे विजय जयवंतराव दांदडे यांनी केली आहे. डोणगाव परिसरात असलेल्या गोहोगाव व बेलगाव परिसरात सध्या परवानगी न घेताच नियमबाह्य उत्खनन करून गौण खनिज समृध्दी महामार्गावर आणून टाकले जात आहे. या प्रकाराची चाैकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.