चाेरट्यांचा हैदाेस : तीन गावांतील एटीएम फाेडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:35 AM2021-07-31T04:35:25+5:302021-07-31T04:35:25+5:30
बुलडाणा : चाेरट्यांनी एकाच मार्गावरील तीन गावांतील एसबीआय बँकेेचे एटीएम फाेडून ५६ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना ...
बुलडाणा : चाेरट्यांनी एकाच मार्गावरील तीन गावांतील एसबीआय बँकेेचे एटीएम फाेडून ५६ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना ३० जुलै राेजी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे़ खामगाव तालुक्यातील पळशी बु., चिखली तालुक्यातील उंद्री आणि शेलुद बु. येथील एसबीआय बँकेच्या एटीएमला चाेरट्यांनी लक्ष्य बनवले आहे़ एकाच रात्री ५६ लाख रुपये पळवणाऱ्या चाेरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान पाेलिसांसमाेर आहे़
उंद्री येथून ९़ ९६ लाख लंपास
अमडापूर : चिखली तालुक्यातील उंद्री येथील लाखनवाडा रस्त्याला लागून असलेल्या स्टेट बँक शाखेचे एटीएम फोडून ९़ ९६ लाख रुपये चाेरट्यांनी पळविल्याची घटना ३० जुलै रोजी उघडकीस आली आहे. याबाबत मनोज परसराम वाढई, व्यवस्थापक एसबीआय, शाखा उंद्री यांनी अमडापूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. यामध्ये २९ जुलैच्या सायंकाळी ते एटीएमचे शटर बाहेरून लाॅक करून निघून गेले हाेते. ३० जुलै रोजी सकाळी १० वाजता एटीएमचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी एटीएममधील ९ लाख ९६ हजार ५०० रुपये लंपास केले आहेत. याप्रकरणी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़
एटीएम फोडून २७ लाखांची रोकड लंपास!
चिखली : येथून जवळच असलेल्या शेलूद येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडून सुमारे तब्बल २७ लाख रुपये लंपास केल्याची घटना ३० जुलै रोजी उघडकीस आली आहे. शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शेलूद येथील स्टेट बँकेच्या शाखा इमारतीमध्ये हिताची कंपनीचे करार पद्धतीवर एटीएम आहे. ३० जुलैला रात्री साडेबारा ते दीड वाजेच्या सुमारास तीन चोरटे चेहरा बांधून आले. त्या वेळी एटीएम शटर बंद होते. चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने शटर तोडले तसेच या ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या वायर कापून टाकल्या. शटर तोडल्यानंतर गॅस कटरने एटीएम फोडले व त्यातून तब्बल २७ लाख २२१ रुपयांची रक्कम लंपास केली आहे. चोरट्यांनी एटीएम फोडण्यापूर्वी परिसरात रेकी केल्याचेही दिसत आहे. दरम्यान, ३० जुलै रोजी सकाळी बँकेचे कॅशिअर अनिल सुरडकर बँकेत आले असता त्यांना एटीएम फोडल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने चिखली पोलिसांना कळविल्यानंतर ठाणेदार गुलाबराव वाघ यांनी आपल्या चमूसह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी राकेश विजयसिंग वसाये बुलडाणा यांनी चिखली पोलिसांत दिलेल्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यमावार, बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बळीराम गिते, चिखलीचे ठाणेदार गुलाबराव वाघ यांनी भेट दिली. या वेळी ठसेतज्ज्ञ व श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते.