गोवर, रुबेलाच्या ‘टार्गेट’साठी आरोग्य विभागाची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 06:02 PM2019-01-09T18:02:05+5:302019-01-09T18:02:09+5:30
बुलडाणा: जिल्ह्यात गोवर रुबेला लसीकरणाचे काम ८० टक्क्यापर्यंत झाले असून लसीकरणाच्या उद्दिष्ट पुर्ततेसाठी १५ जानेवारीची मुदत आरोग्य विभागाला देण्यात आली आहे. आतापर्यंत लसीकरण झालेल्यांची संख्या साडे पाच लाखापर्यंत गेली आहे; मात्र आतापर्यंत जिल्ह्यात सात लाख लाभार्थ्यांना लसीकरण करणे अपेक्षीत होते, त्यामुळे गोवर रुबेलाच्या टार्गेट पुर्ततेसाठी आरोग्य विभागाची धावपळ सुरू आहे
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: जिल्ह्यात गोवर रुबेला लसीकरणाचे काम ८० टक्क्यापर्यंत झाले असून लसीकरणाच्या उद्दिष्ट पुर्ततेसाठी १५ जानेवारीची मुदत आरोग्य विभागाला देण्यात आली आहे. आतापर्यंत लसीकरण झालेल्यांची संख्या साडे पाच लाखापर्यंत गेली आहे; मात्र आतापर्यंत जिल्ह्यात सात लाख लाभार्थ्यांना लसीकरण करणे अपेक्षीत होते, त्यामुळे गोवर रुबेलाच्या टार्गेट पुर्ततेसाठी आरोग्य विभागाची धावपळ सुरू आहे.
गोवर आणि रुबेला या आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत २७ नोव्हेंबरपासून राज्यभर व्यापक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. गोवर मुळे भारतात दरवर्षी ५० हजार जण मृत्यूमुखी पडतात. गोवरमुळे रुग्णाच्या शरीरातील ‘अ’ जीवनसत्वाचे प्रमाण खूप कमी होते. रुबेला हा गर्भवती मातेला झाल्यास तिचा गर्भपात होऊ शकतो. बालकास मोतिबिंदू, ह्रदयविकार, मतिमंदत्व, बहिरेपणा व शरीराची वाढ खुंटणे आदी आजार होऊ शकतात. रुबेला हा पूर्णपणे संसर्गजन्य आहे. भावी पिढीला सुरक्षित ठेवण्यासाठी हे लसीकरण आवश्यक असल्याने सर्वत्र ही मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. राज्यात नऊ महिने ते १५ वर्षांपर्यंतच्या सुमारे ३ कोटी ३८ लाख बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार उदिष्ट पुर्ततेसाठी राज्यातून जिल्हानिहाय आढावा घेण्यात येत आहे. लसीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाच्या हालचाली सुरू आहेत. जिल्ह्यात लाभार्थ्यांना यशस्वी लसीकरण झालेल्यांची संख्या साडे पाच लाखांवर गेली असून उद्दिष्ट पुर्ततेसाठी १५ जानेवारीची मुदत आरोग्य प्रशासनाला देण्यात आलेली आहे. त्यानुसार सध्या आरोग्य विभागाचे कर्मचारी कामाला लागले असल्याचे दिसून येते.
शेवटचे दोन आठवडे मोहिमेत लसीकरण न झालेल्यांसाठी
पहिल्या सत्रात पहिल्या दोन आठवड्यांत सर्व शाळांमध्ये मोहीम राबविण्यात आली. त्यापुढील दोन आठवडे अंगणवाडी, फिरत्या पथकाद्वारे व बाह्य संपर्क लसीकरण सत्र राबविण्यात आले आहे. अशा प्रकारे लाखो बालकांना लसीकरण देण्यात आले आहे. मात्र आता शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये ज्या बालकांचे या मोहिमेत लसीकरण झालेले नाही त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
लसीकरण शेवटच्या टप्यात
नोव्हेंबर अखेरपासून सुरू असलेले गोवर, रुबेला लसीकरण काम सध्या शेवटच्या टप्प्यात आले आहे. लसीकरणासाठी दिलेली मुदतही जवळ येत असल्याने आरोग्य विभागाकडून गावोगाव पिंजून काढण्यात येत आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी सध्या लसीकरणाच्या उद्दिष्ट पुर्तीच्या कामात व्यस्त दिसून येत आहेत.
७ लाख लाभार्थी होणे अपेक्षीत
जिल्ह्यात गोवर, रुबेला लसीकरणाची संख्या आजपर्यंत सात लाखावर होणे अपेक्षीत होते. मात्र ५ लाख ५७ हजार ८६६ बालकांना लसीकरण देण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरीत बालाकांपर्यंत लसीकरण पोहचविण्याच्या कामात गती वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात ८० टक्के गोवर, रुबेला लसीकरणाचे काम पुर्णत्वास गेले आहे. नियमीत लसिकरणाचे काम गतीमान करण्यासाठी सहकार्याची गरज आहे. मोहीमेमध्ये लसीकरण बाकी असलेल्या बालकांना तातडीने लस देण्यात यावी.
- डॉ. रविंद्र गोफने, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी, बुलडाणा.