बुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क व तत्पर- डॉ. प्रेमचंद पंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 11:57 AM2020-04-05T11:57:38+5:302020-04-05T11:57:55+5:30
जिल्ह्याचे इंसिडंन्ट कमांडर तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्याशी साधलेला संवाद.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोना संसर्गाने एकाचा मृत्यू झाल्यामुळे बुलडाणा जिल्हा सध्या चर्चेत आला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात करण्यात आलेल्या उपाययोजना व एकंदर स्थिती संदर्भात जिल्ह्याचे इंसिडंन्ट कमांडर तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्याशी साधलेला संवाद.
कोरोना संसर्गाशी मुकाबला करण्यासाठी जिल्ह्याची सज्जता कितपत आहे?
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात आवश्यक उपाययोजना केलेल्या आहेत. यंत्रणाही अलर्टवर आहे. तीन ठिकाणी आयसोलेशन कक्ष उभारण्यात आले आहे. महसूल, आरोग्य व जिल्हा परिषद प्रशासनाच्या समन्वयाने दर्जेदारपद्धतीने आपण काम करत आहोत. यंत्रणेचे मनोबलही चांगले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गाफील न राहता कामे करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुषंगाने यंत्रणा अलर्टवर आहे.
आतापर्यंत किती जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.?
जिल्ह्यातून आपण आतापर्यंत ८६ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविलेले आहेत. पैकी केवळ पाच जणांचे नमुने पॉझीटीव्ह आले असून यातील एकाचा मृत्यू झाला आहे. त्याच्या निकटच्या संपर्कातील चार व्यक्तींचा यात समावेश आहे. पाठविलेल्या नमुन्यांपैकी ६४ नमुने प्राप्त झाले असून त्यापैकी ५९ नमुने हे निगेटीव्ह आहेत.
क्वारंटीन व आयसोलेशनमधून किती रुग्णांना आतापर्यंत सुटी देण्यात आली?
जिल्ह्यात आढळेल्या संदिग्ध रुग्णांपैकी आतापर्यंत जवळपास १२७ रुग्णांना आपण सुटी दिली आहे. यामध्ये आयसोलेशन वॉर्डमधील १८ जणांचा समावेश आहे.
स्त्री रुग्णालयाला विशेष दर्जा दिला का?
होय. राज्य शासनाने कोरोना संसर्ग झालेल्या व संदिग्ध रुग्णांसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एका विशेष रुग्णालयाची घोषणा केली आहे. त्यानुसार बुलडाणा येथील स्त्री रुग्णालयास हा दर्जा मिळाला आहे. येथेच हॉस्पीटल क्वारंटनी व आयसोलेशन मधील रुग्ण आपण ठेवतो.
हायरिस्क झोनमधील तपासणीबाबत?
शहरातील १२ नगरामधील लोकसंख्या ही हायरिस्क झोनमध्ये येते. त्यांची आरोग्य पथकाकंडून तपासणी करण्यात येत आहे. या नागरिकांचेही तपासणीसाठी सहकार्य मिळत आहे. आयसोलेशन व हॉस्पीटल क्वारंटीनमधील रुग्णांचीही प्रोटोकॉल नुसार नियमित तपासणी करण्यात येत आहे. कोरोना पॉझीटीव्ह असलेल्या चार रुग्णांचीही नियमित तपासणी सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या चौघांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील व्यक्तीं ट्रेस आऊट करण्यात आपल्याला यश येत आहे.