नांदुरा : पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने तालुक्यात दुष्काळग्रस्त स्थिती असताना १९ नोव्हेंबरच्या दुपारी नांदुरा शहर व परिसरात अर्धा तास पाऊस पडल्याने नागरिकांची धांदल उडाली. शिवाय आठवडी बाजारात भाजी विक्रेत्यांची तर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची चांगलीच दाणादाण पावसाने उडवली . पावसाळ्यात पावसाने दडी मारल्याने या वर्षी सर्वत्र दुष्काळी स्थिती असून शेतीमालाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली अाहे. ऑक्टोबर महिन्यापासूनच पाणीटंचाईचे सर्वत्र जाणवू लागली असताना दिनांक १९ नोव्हेंबरच्या दुपारी दीड ते दोन वाजेदरम्यान सुमारे अर्धातास नांदुरा शहर व परिसरात धो धो पाऊस पडला आहे. सोमवार हा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने ग्रामीण भागातील नागरिक आठवडी बाजारा करिता नांदुरा शहरात मोठय़ा संख्येने येतात. या पावसामुळे त्यांची व भाजी विक्रेत्यांची चांगलीच दाणादाण उडाली व आठवडी बाजार परिसरात सर्वत्र चिखल व पाणी साचले हाेते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील विक्रीस आलेले धान्य सुद्धा पावसाने भिजले. मात्र बाजार समितीचे सभापती बलदेवराव चोपडे, उपसभापती संजय फणसे व इतर संचालक व सचिव गौरव गवळे यांनी तातडीने धान्य मोजून घेतले. अवेळी पडलेल्या या अर्ध्या तास पावसामुळे शेतांमधील थोडय़ाफार प्रमाणात निघत असलेला कापूस ओला झाल्याने शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच दुष्काळी स्थितीमुळे उत्पादनात मोठी घट झाली असून थोड्या फार प्रमाणात निघणारा कापूसही आता ओला झाला आहे . अवेळी आलेल्या पावसाने नांदुरा शहरातील आठवडी बाजारातील भाजी विक्रेत्यांचे व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे.