लांडग्यांचा हैदोस, तीन बक-या फस्त
By admin | Published: April 27, 2015 01:30 AM2015-04-27T01:30:37+5:302015-04-27T01:30:37+5:30
बिबी परिसरातील घटना.
बिबी (जि. बुलडाणा): बिबी परिसरात लांडग्यांनी तीन बकर्या फस्त केल्याची घटना २५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता घडली. परिसरात लांडग्यांनी हैदोस घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोणार तालुक्यातील बिबी येथील गुलाब बापूजी गावडे यांची कोरडवाहू तीन एकर शेती आहे. शेतीला जोडधंदा म्हणून ते शेतातच शेळीपालन करतात. दोन बकर्या व त्या बकर्यांची चार पिलं होती. शेतात बांधलेल्या बकर्यांवर २५ एप्रिलच्या रात्रीच्या सुमारास लांडग्यांनी हल्ला केला. लांडग्यांच्या या हल्ल्यामध्ये तीन बकर्या जागेवरच ठार झाल्या, तर दोन बकर्या गंभीर जखमी झाल्या आहेत. परिसरात लांडग्यांचा वावर वाढलेला असून, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. टोळीने राहत असलेल्या लांडग्यांमुळे पाळीव प्राणी व नागरिकांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. लांडग्यांच्या दहशतीमुळे कृषिकामासाठी महिला मजूरही शेतात जाण्यास तयार नाहीत. लांडग्यांनी बकर्यांवर हल्ला केल्याने गुलाब गावडे यांचे ३0 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाकडून या प्राण्यांचा बंदोबस्त व्हावा तसेच वनविभागाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी गुलाब गावडे यांनी केली आहे.