बुलडाणा: भरधाव वेगातील रुग्णवाहिकेने रस्त्याच्या कडेला पालात झोपलेल्या भटक्या समाजातील दोघांचे प्राण घेतले. या घटनेतील मृत भटक्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची आर्थिक मदत व घरकूल बांधून देण्यात यावे, रुग्णवाहिकेच्या चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भटक्या-विमुक्तांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
येथील त्रिशरण चौकानजीक भरधाव वेगातील रुग्णवाहिकेच्या चालकाद्वारे झालेल्या अपघातात रस्त्याच्या कडेला पाल ठोकून झोपलेल्या भटक्या समाजातील एका कुटुंबाचे दोन सदस्य मृत्युमुखी पडले. या घटनेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व मृत भटक्यांच्या कुटुंबीयांना मदत उपलब्ध करून देण्यासाठी भटके-विमुक्त संघटना मूलनिवासी मुक्ती मोर्चा व अन्य संघटनांनी मिळून जिल्हाधिकाऱ्यांना संयुक्त निवेदन दिले आहे. यावेळी भारतीय आदिवासी भटके विमुक्त यूथ फ्रंटचे अध्यक्ष समाधान गुऱ्हाळकर, मूलनिवासी मुक्ती मोर्चाचे संस्थापक प्रशांत सोनोने, अ.भा. वामपंथी महासंघाचे गोविंद बोरकर, अनिल पाखरे, राजू गवई, अनंत मिसाळ, बाला राउत, गणेश भिसे आदी उपस्थित होते.