अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:23 AM2021-06-20T04:23:46+5:302021-06-20T04:23:46+5:30
चिखली : बुलडाणा जिल्हा व चिखली तालुक्यात अतिवृष्टीने शेतजमिनी खरडून गेल्या असून, यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या ...
चिखली : बुलडाणा जिल्हा व चिखली तालुक्यात अतिवृष्टीने शेतजमिनी खरडून गेल्या असून, यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या उलटल्यासह सुमारे नऊ विहिरी खचल्या असल्याने या नुकसानीची तातडीने पाहणी करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे.
चिखली तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना १६ जूनच्या अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला आहे. शेतजमिनी खरडून गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. महसूल विभागाच्या माहितीनुसार चिखली तालुक्यात नुकसानीचा व खरडून गेलेल्या शेतजमिनीचे क्षेत्र १३८.४९ हेक्टर आहे. यामध्ये प्रामुख्याने उंद्री, वैरागड, हरणी, टाकरखेड मुसलमान, अमडापूर, मुंगी, धानोरी, किन्ही सवडद, घानमोड व अमडापूर मंडळामधील शेतजमिनीचा समावेश आहे. या अतिवृष्टीचा सुमारे २५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना तीव्र स्वरूपाचा फटका बसला आहे. जमिनीसह सुमारे नऊ विहिरी खचल्या आहेत. वैरागड येथील शेतकऱ्यांचे ९० पाईप वाहून गेले आहे, तर अमडापूर व किन्ही सवडद येथे प्रत्येकी एक माती नाला बांध फुटला आहे. मुंगी येथे एक शेततळे जमीनदोस्त झाले आहे. या सर्व नुकसानीची बाळासाहेब थोरात यांची प्रत्यक्ष भेट घेऊन राहुल बोंद्रे यांनी माहिती दिली़
मंत्री थाेरात यांनी दिले मदतीचे आश्वासन
आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर आत ऐन हंगामाच्या सुरुवातीलचा हा आघात झाला असल्याने त्यांना यातून सावरण्यासाठी तातडीने मदत देणे गरजेचे आहे, असे स्पष्ट करतानाच बुलडाणा जिल्हा व चिखली तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने पाहणी करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, आशी मागणी मंत्री थोरात यांच्याकडे लावून धरली आहे. दरम्यान, या मागणीची दखल घेत मंत्री थोरात यांनी संबंधित यंत्रणेला तत्काळ कारवाईचे निर्देश देण्यासह शेतकऱ्यांना तत्काळ मदतीचे आश्वासन बोंद्रे यांना दिले आहे.