बुलडाणा जिल्ह्यात आणखी एक टायगर कॉरिडॉर निर्माण होण्याचे आशादायक चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 03:16 PM2019-12-01T15:16:19+5:302019-12-01T15:16:31+5:30
यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील वाघ बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवरील जंगला आल्याची चर्चा आहे.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील वाघ थेट बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या घाटबोरीच्या जंगलात आल्याच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यात आणखी एक ‘टायगर कॉरिडॉर’ निर्माण होण्याचे आशादायक चित्र आहे.
घाटबोरीच्या जंगलात वाघ असल्याचे वृत्त व स्थानिक नागरिकांमधील घबराट पाहता वाईल्ड लाईफ आॅफ इंस्टीट्यूटच्या दोन पथकांची या भागात बारिक नजर असून घाटबोरीपर्यंत आलेला हा वाघ परतीच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र शेड्यूल ए मधील प्राणी असल्याने त्याचे संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने काही बाबी गोपनियच ठेवणे गरजेचे असल्याचे वनविभागातील वरिष्ठ सुत्रांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे मेळघाटमधील वाघ अनेरडॅम अभयारण्यापर्यंत नेण्याचा प्रस्ताव व योजनाही गेल्या चार वर्षापासून संकल्पीत स्तरावर आहे. त्यातच फेब्रुवारी २०१९ च्या पहिल्या आठवड्यात मलकापूर तालुक्यातील दुधलगाव परिसरात वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले होते. त्यावेळी परिसरात चार ट्रॅप कॅमेरेही लावण्यात आले होते. परिणामी जळगाव खान्देश जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि वढोदा वन परिसरात वाघ असल्याच्या बाबीस पुष्टी मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. आता यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील वाघ बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवरील जंगला आल्याची चर्चा या भागात गुरांची त्याने केलेली शिकार पाहता त्याच्या अस्तित्वाची जाणीव होत असून प्रसंगी एक मोठा कॉरिडॉर त्यादृष्टीने निर्माण करण्याची गरज आहे. आता डिसेंबरमध्ये होणाऱ्या टायगर सेलच्या बैठकीत याबाबतच्या अनेक बाबी उहापोह होईल. नाही म्हणायला सा महिन्यातून किमान एकदा टायगर सेलची बैठक होणे क्रमप्राप्त आहे.
वाघ आता परतीच्या मार्गावर
वाईल्ड लाईफ आॅफ इंडिया या भागातील स्थितीवर लक्ष ठेवून असून कथितस्तरावर आलेला हा वाघ आता परतीच्या मार्गावर असल्याचेही संकेत मिळत आहे. प्रसंगी हा वाघ बुलडाण्यालगतच्या ज्ञानगंगा अभयारण्यापर्यंत पोहोचल्यास अस्वलांसाठी प्रसिद्ध असलेल्या या १९९७-९८ मध्ये अभयारण्याचा दर्जा दिलेल्या या जंगलासाठी ही बाब महत्त्वपूर्ण ठरले.वाघाच्या संरक्षणाच्या दृष्टीने वनविभागाकडून बाबी गोपनिय ठेवण्यात येत आहेत.