फलोत्पादन अभियानाची अर्ज प्रक्रिया गोंधळात; शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 05:24 PM2018-06-17T17:24:02+5:302018-06-17T17:24:02+5:30
- ओमप्रकाश देवकर
हिवरा आश्रम : महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना राबविण्यात येत असून त्यामध्ये विविध घटकांकरिता लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. मात्र फलोत्पादन अभियानाच्या अर्जा संबंधिच्या मार्गदर्शक सूचना वेळेवर आल्याने शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. आॅनलाईन अर्जासाठी २० जून ही अंतमी मुदत असून अर्ज करण्याच्या माहितीअभावी शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कृषी विभागाकडून पुर्वी फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत विविध घटकासाठी कृषी कार्यालयात शेतकऱ्यांकडून अर्ज स्वीकारल्या जात होते. मात्र गेल्या काही वर्षापासून या योजनासाठी अर्ज आॅनलाईन पध्दतीने स्वीकारल्या जात आहेत. कृषी कार्यालयात या कामासाठी क्षेत्र सल्लागार म्हणून कंत्राटी कर्मचारी काम पाहत होते. मात्र शासनाने गेल्या वर्षीपासून या कंत्राटी कर्मचाऱ्यांना या पदावरून कायमचे कार्यमुक्त केले. यामुळे शेतकऱ्यांना बाहेरून आॅनलाईन अर्ज भरावे लागत आहे. यावर्षी बराचसा बदल या अर्ज करण्याच्या हॉर्टनेट प्रणालीमध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. आतापर्यंत फक्त माहिती हॉर्टनेट प्रणालीवर भरल्या जात होती; पण २०१८-१९ पासून यामध्ये बदल करण्यात आले आहे. यामध्ये पुर्ण कागदपत्रे ही हॉर्टनेट प्रणालीवर अपलोड करावी लागत आहेत. शिवाय शासनाने हे संकेतस्थळ सुरू ठेवल्याने बºयाच शेतकऱ्यांनी एप्रिल व मे मध्ये आॅनलाईन नोंदणी केली. मात्र कृषी विभागाने एक पत्रक काढून १ ते २० जून पर्यंतची नोंदणी करण्यासाठी वेळ दिल्याने आणि हा वेळ अपूरा असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने हा वेळ वाढविण्यात यावा, ही मागणी शेतकºयांकडून होत आहे.
शेतकऱ्यांमध्ये संभ्रम
एप्रिल व मे मध्ये आॅनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार किंवा नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पुर्वी नोंदणी केलेल्या अर्जाची पुन्हा नोंदणी होत नाही. त्यामुळे पुर्वीच्या अर्जाना कागदपत्रे आॅनलाईन अपलोड करावी की, कसे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.
अर्जासाठी मुदतवाढीची गरज
सदर हॉर्टनेट प्रणालीवर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी सदर संकेतस्थळ बऱ्याच वेळा बंद राहते. ४ जूनपर्यंत अॅक्शन प्लॅन अपलोड नसल्याने शेतकऱ्यांना अर्ज भरता आले नाही. सदर अर्ज भरण्याकरीता मुदतवाढ मिळणे गरजेचे आहे.
हॉर्टनेट म्हणजे काय?
हॉर्टनेट एक एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाची संगणक प्रणाली असून त्यावर या अभियानाअंतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यात येतात. यामध्ये अळींबी उत्पादन, सामुहीक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, शेडनेट हाऊस, हरीतगृह, प्लास्टीक मल्चींग, फळबाग असणाºया शेतकऱ्यांना २० एचपी ट्रॅक्टर, पॅकहाऊस, कांदाचाळ उभारणी प्रकल्प अशा विविध घटकांसाठी शेतकऱ्यांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.