यश हवे असेल, तर गरीब, खेड्यातील असल्याचा न्युनगंड दूर करा : विशाल नरवाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 06:01 PM2020-08-08T18:01:09+5:302020-08-08T18:01:26+5:30
लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातून ९१ वा तसेच ओबीसी प्रवर्गातून महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावणाºया विशाल नरवाडे यांच्याशी साधलेला संवाद
- संदीप वानखडे
बुलडाणा : स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी कठोर मेहनत तर आवश्यक आहेच. त्याहीपेक्षा आपण गरीब आहोत..खेड्यातील आहोत, असा न्यूनगंड बाळगणे आधी दूर केले पाहिजे, असा मोलाचा सल्ला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातून ९१ वा तसेच ओबीसी प्रवर्गातून महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावणाºया विशाल नरवाडे यांनी दिला आहे. आयपीएससाठी निवड होवूनही त्यांनी परिश्रम घेत आयएएसचे यशोशिखर गाठले. त्यांच्याशी साधलेला संवाद.
आयएएसपर्यंतचा प्रवास कसा होता?
माजे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा सावळी येथे झाले. दहावीपर्यंत नवोदय विद्यालय शेगाव येथे शिक्षण घेल्यानंतर ११ वी व १२ वीचे शिक्षण लातूर येथे केले. त्यानंतर अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर मी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली होती.
आयपीएस असतानाही आयएसएस होण्याचा विचार कसा आला?
युपीएससी परीक्षेची तयारी केल्यानंतर मला तिसºया प्रयत्नात यश आले. माझी आयपीएससाठी निवड झाल्यानंतर पंश्चिम बंगालमध्ये सेवा देत आहे. सेवा देत असताना जिल्हाधिकारी जे सामाजिक कार्य करू शकतात ते आयपीएसला शक्य नाही. त्यामुळे मी आणखी अभ्यास सुरू केला आणि सहाव्या प्रयत्नात मी आयएएस झालो. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी; तसेच ज्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत त्या सोडविण्यासाठीच आयएएस व्हायचा निर्धार केला.
आयएसएसची तयारी कशी केली?
अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर मी युपीएससीची तयारी सुरू केली. तुम्ही किती तास अभ्यास करता याला महत्त्व नाही तर मनापासून किती करता याला महत्त्व आहे. त्यामुळे १६ ते १८ तास अभ्यास केला तरच यश मिळते असे काही नसते. मी मनापासून आठ ते दहा तासच अभ्यास केला. माझी तिसºया प्रयत्नाच आयपीएससाठी निवड झाली. त्यानंतर माझी आयआरएससाठीही निवड झाली होती. परंतु, मला आयएएसच व्हायचे असल्याने ती मी नाकारली. परीश्रमाच्या बळावर मी आज ओबीसी प्रवर्गात महाराष्ट राज्यात प्रथम आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल?
सध्या अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. मात्र त्यातील बहुतांश विद्यार्थी सोशल मिडीयाच्या आहारी गेलेले असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयावर वेळ व्यर्थ न घालवता अभ्यासात घालवावा. आठ ते दहा तास अभ्यास केल्यावरही यश मिळतेच. गरीबी, ग्रामीण भागातील असल्यामुळे यश मिळणार नाही, असा विचार विद्यार्थ्यांनी आधी काढून टाकावा. सकारात्मक विचार करून युपीएससीची तयारी केल्यास यश हमखास मिळतेच.
काय करायचे त्याचबरोबर काय नाही करायचे हे ठरवणे आवश्यक आहे. ध्येय निश्चित करून त्यानुसार परीश्रम घेतल्यास यश निश्चितच मिळते. गरीब, ग्रामीण भागातील विद्यार्थी आयएएसपर्यंत पोहचत आहेत. त्यामुळे, परिश्रम घेतल्यास यश मिळतेच. ग्रामीण भागातील असल्याचा न्युनगंड बाळगू नका. परिश्रम मनापासून केल्यास यश निश्चितच मिळते. त्यामुळे परिश्रम करा.
- विशाल नरवाडे