किनगाव जट्टू बसस्थानकावर पूर्वीचा प्रवासी निवारा होता, परंतु शासनाचे वतीने दुसरबीड, किनगाव जट्टू मार्गे लोणार रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले. त्यावेळी किनगाव जट्टू बसस्थानकावरील जुना प्रवासी निवारा पाडण्यात आला. या रस्त्याचे काम बरेच दिवसापासून झाले आहे. येथे कोणतेही काम चालू नाही, परंतु येथे प्रवासी निवारा बांधण्यात आला नाही. किनगाव जट्टू परिसरातील दहा ते बारा खेड्यांतील नागरिकांना बाहेरगावी इतरत्र कोणत्याही ठिकाणी जायचे असल्यास तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याकरिता बाहेरगावी जाण्याकरिता किनगाव जट्टू येथूनच जावे लागते. येथे प्रवासी निवारा नसल्याने रस्त्यावर उभे राहावे लागत असल्याने एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्यावर अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या भुमराळा फाट्यावर व जऊळका फाट्यावर दोन्ही ठिकाणी रोडच्या दोन्ही बाजूने प्रवासी निवारे बरेच दिवसापासून बांधले आहेत. दरम्यान, किनगाव जट्टू गावावरच असा अन्याय का? असा प्रश्न प्रवासी वर्गाला पडला आहे. किनगाव जट्टू बसस्थानकावर प्रवासी निवारा बांधून देण्यात यावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा लोणार तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सहदेव लाड यांनी दिला आहे. किनगाव जट्टू बसस्थानकावर जागा उपलब्ध करून दिल्यास त्वरित प्रवासी निवाऱ्याचे काम सुरू करण्यात येईल येईल, अशी माहिती ठेकेदार राजेंद्र काटे यांनी दिली.
रस्ता काम पूर्ण होऊनही प्रवासी निवाऱ्याकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 4:18 AM