मेहकर : शहरातील विविध वॉर्डांत मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. विविध वॉर्डसह सार्वजनिक ठिकाणी घाण व दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नगरपालिकेने मान्सूनपूर्व स्वच्छता अभियान राबविली नसल्याने नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहेत.
मेहकर शहरात विविध प्रभागांतील नाल्यांमध्ये कचरा घाण मोठ्या प्रमाणावर साचले आहे. त्यातून निघत असलेल्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. नगर परिषदेने सफाई मोहीम राबवून सर्वांत पसरलेल्या घाण-कचरा साफ करावे, अशी मागणी जोर धरत आहे. स्थानिक गवळीपुरा येथील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले असून, सार्वजनिक बांधलेल्या शौचालयाच्या परिसरही घाणीमुळे तुडुंब भरल्याने महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. या वॉर्डात गेल्या अनेक महिन्यापासून कोणतेच कर्मचारी फिरकत नसल्याचे या वॉर्डातील मेहकर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष रहीम गवळीसह नागरिकांनी नगर परिषदेला दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे.
कर्मचाऱ्यांचा फाैजफाटा तरीही अस्वच्छता
मेहकर नगर परिषदेत ४४ सफाई कर्मचाऱ्याकडे नाल्या साफ करण्याचे काम आहे. तसेच २८ महिला सफाई कर्मचारी हे रस्ते साफसफाईचे काम करतात. शहरातील घाण-कचरा फेकण्यासाठी कंत्राटदार यांच्यामार्फत घंटा गाड्यांवर ७७ कर्मचारी काम करीत आहेत. दररोज चार वॉर्डात साफसफाईचे काम होत असल्याचे नगर परिषदेचे म्हणणे आहे.
शहरातील रहमतनगर, गवळीपुरा, कत्तलखाना परिसर, इमामवाडा चौक परिसर लेंडी तलाव परिसर आदी अनेक ठिकाणी कचरा व घाणीने नाल्या तुडुंब भरलेले आहेत.
भाजी मार्केटमध्येही घाणीचे साम्राज्य
स्थानिक महात्मा फुले भाजी मार्केट ही सर्वत्र कचरा घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. या मार्केटमधील नाल्यात कचरा गेल्या अनेक महिन्यांपासून सफाई न केल्यामुळे साचला आहे. त्याच ठिकाणी भाजीविक्रेते आपापले दुकाने थाटून बसत आहे. या आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणावर वरली, मटका, दारू पिणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर राहत असल्याने कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नगर परिषदेने तत्काळ सफाई मोहीम राबून शहरातील सर्वच सार्वजनिक ठिकाणी असलेल्या शाैचालयांसह नाल्यांची साफसफाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
काेट
शहरातील साफसफाईचे काम सुरू असून, नागरिकांनी कचरा पेटीमध्ये कचरा टाकून सहकार्य करावे.
संजय गिरी
स्वच्छता निरीक्षक नगर परिषद मेहकर