गौण खनिजाचे अवैध उत्खनन; पोकलेन, तीन टिप्पर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 10:24 AM2020-05-17T10:24:22+5:302020-05-17T10:24:43+5:30
महसूल पथकाने देऊळघाट नजीकच्या अफजलपूर येथे शुक्रवारी दुपारी ही कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : बुलडाणा - अजिंठा महामार्गाच्या कामासाठी मुरुमाचे अवैध उत्खनन करणारे तीन टिप्पर व एक पोकलॅन जप्त करण्यात आले आहेत. तहसीलदार संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनात महसूल पथकाने देऊळघाट नजीकच्या अफजलपूर येथे शुक्रवारी दुपारी ही कारवाई केली. याप्रकरणी १४ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती, तहसीलदारांकडून मिळाली.
जिल्ह्यात विनापरवाना गौण खनिज उत्खननाचे प्रकार समोर येत आहे. शुक्रवारी दुपारी देऊळघाट नजीकच्या अफजलपूर येथील नदीतून अवैध मुरुमाचे उत्खनन सुरु असल्याची माहिती तहसीलदार संतोष शिंदे यांना मिळाली. त्यानुसार महसूल व पोलिस विभागाच्या पथकाने घटनास्थळावर धाव घेतली. यावेळी पोकलॅनच्या साहाय्याने विनापरवाना मुरुम उत्खनन सुरु असल्याचे दिसून आले. एका टिप्परमध्ये मुरुम भरणे सुरु होते व दोन टिप्पर शेजारी उभे होते. विचारपूस केली असता सुनील हायटेक कंपनीकडून बुलडाणा- अजिंठा महामार्गाच्या कामासाठी हे मुरुम उत्खनन सुरु असल्याची माहिती मिळाली. जप्त केलेले टिप्पर तहसील कार्यालयात लावण्यात आले आहे.
मुरुम उत्खनन पायलट प्रोजेक्टसाठी?
नदी, नाले खोलीकरण करुन त्यामधील मुरुम महामार्गाच्या कामासाठी वापरण्याचा प्रयोग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुरु केला. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेवरुन त्याची सुरुवात बुलडाण्यातून करण्यात आली. या पायलट प्रोजेक्टसाठी हे मुरुम उत्खनन सुरु होते. उत्खनन केलेला मुरुम बुलडाणा - अजिंठा महामार्गासाठी वापरण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.
अवैध उत्खनन करणाऱ्यांकडे स्पष्टीकरण मागितले असता त्यांनी कोलवड येथील पावती पुस्तक दाखविले. तर दत्तपूर येथे उत्खननाबाबत २०१८ चा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश दाखविला. त्यामुळे तीन टिप्पर व एक पोकलॅन जप्त करण्यात आले आहे. -संतोष शिंदे तहसीलदार, बुलडाणा