जिल्ह्यातील ठरावीक रेती घाट सुरू झाले आहेत. परंतु ज्या ठिकणावरून रेती उत्खनन बंद आहे, त्या ठिकाणावरूनही अवैध उत्खनन सुरूच आहे. जिल्ह्यातील रेती उत्खननाबाबत प्रशासनाने अनेक वेळा कारवाईची मोहीम राबवली. मात्र रेतीच्या अवैध वाहतुकीला अंकुश बसत नसल्याचे दिसून येते.
नियमांचे उल्लंघन करून रेती उत्खनन
देऊळगावमही : हर्रासी झालेल्या रेती घाटामध्ये ठेकेदार व संबंधित कर्मचाऱ्यांकडून नियमाचे उल्लंघन करून रेती उपसा सुरू आहे. त्याची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अनिल चित्ते यांनी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गुरुवारी निवेदन देण्यात आले. सिंदखेड राजा व देऊळगाव राजा या तालुक्यामधून पूर्णा नदीवरील घाटाची हार्राशी झाली आहे. परंतु संबंधित ठेकेदाराने नियमांचे पूर्णपणे उल्लंघन करून जेसीबी, पोकलँडद्वारे मोठमोठे खड्डे पाडून घाटावर रेतीचे उत्खनन करीत आहेत. रेती घाटावर सीसी कॅमेरे लावणे आवश्यक असताना सर्व नियमांचे उल्लंघन येथे होत आहे. यासंदर्भात वारंवार विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हजारो ब्रास रेती अवैधपणे ठेकेदाराने उचलली आहे. परिणामी, शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी संबंधित घाटाची चौकशी करून ठेकेदार व संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.