कोरोनामुक्त ग्राम अभियानाची अंमलबजावणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:34 AM2021-05-26T04:34:19+5:302021-05-26T04:34:19+5:30
ओमप्रकाश देवकर मेहकरः राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे. सुरुवातीला शहरी भागात असणारा कोरोनाचा प्रसार ग्रामीण भागातही वाढत आहे. ...
ओमप्रकाश देवकर
मेहकरः राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे. सुरुवातीला शहरी भागात असणारा कोरोनाचा प्रसार ग्रामीण भागातही वाढत आहे. त्यामुळे आता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दत्तक ग्रामयोजना राबविण्यात येत असून, एका कर्मचाऱ्याला एक गाव दत्तक देण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तालुक्यात काही गावे कोरोना प्रादुर्भावाचे हॉटस्पॉट ठरत आहे. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आपल्या गावात वाढू नये, म्हणून ग्रामपंचायत यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, सोबतच ग्रामदक्षता समिती व गावातील युवक मंडळाने समन्वयाने काम करीत आहेत व यापुढेही करावयाचे आहे. पंचायत समिती मेहकरने राबविलेल्या माझे गाव कोरोनामुक्त गाव या माेहिमेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पंचायत समिती मेहकरच्या कार्यक्षेत्रातील गावे कोरोनामुक्तीसाठी दत्तक देण्यात आली आहे. कर्मचारी यांना दत्तक देण्यात आलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रासाठी संपूर्ण कोरोनामुक्ती होईपर्यंत, ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य यंत्रणा व ग्रामदक्षता समिती या तिघांच्या समन्वयाने दत्तक देण्यात आलेल्या गावात काम करायचे आहे. या ग्रामपंचायतीला रोज जाऊन सदरील गावात कोरोनाबाबत सुरू असलेल्या कोरोना चाचणी, कोरोना लसीकरण, कोरोना रुग्ण सर्वेक्षण, विलगीकरण या सर्व बाबींबाबत अनुषंगिक जनजागृती आणि प्रबोधन याबाबत उचित सहकार्य व मार्गदर्शन करावे लागणार आहे, तसेच विहित नमुन्यात दत्तक ग्राम यास केलेला दैनिक भेटीचे अनुषंगाने वरिष्ठांना अद्यावत माहिती पुरवावी लागणार आहे.
कोरोनामुक्तीसाठी दत्तक घेतलेले गाव संपूर्णपणे कोरोनामुक्त होईपर्यंत, यंत्रणा उचित सहकार्य व मार्गदर्शन करून सर्वतोपरी साहाय्य करणार आहे. या दत्तक ग्राम अभियानात काम करताना सर्वांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कोरोनाविषयक सर्व नियमांची काळजीपूर्वक अंमलबजावणी करावी, अशा सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत.
आशिष पवार, गटविकास अधिकारी, मेहकर.
मंडळनिहाय गावांची विभागणी
तालुक्यातील दहा महसूल मंडळनिहाय गावांची विभागणी करून कर्मचारी यांना गावे दत्तक देण्यात आली आहे. यामध्ये केंद्रप्रमुख, समुदाय आरोग्य अधिकारी, कनिष्ठ अभियंता, मुख्याध्यापक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, विस्तारधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी आदींचा यांचा समावेश आहे.