राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात कडधान्य पिकांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:34 AM2021-07-29T04:34:09+5:302021-07-29T04:34:09+5:30
बुलडाणा : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात २०१८-१९ पासून पौष्टिक तृणधान्य व गळीतधान्य पिकांचा समावेश करण्यात आला आहे. ...
बुलडाणा : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात २०१८-१९ पासून पौष्टिक तृणधान्य व गळीतधान्य पिकांचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानासाठी निधीची तरतूद केंद्र व राज्य ६०-४० टक्के प्रमाणे आहे. जिल्ह्यातील अन्नधान्य कडधान्य व गळीत धान्य पिकांचा समावेश या अभियानात करण्यात आला आहे.
पौष्टिक तृणधान्य पिके, नगदी पिकात कापूस पिकाचा समावेश आहे. अभियानामध्ये पीक प्रात्यक्षिके, पीक पद्धतीवर आधारित प्रात्यक्षिके (आंतरपीक), मूलभूत बियाणे खरेदी (गळीत धान्य), प्रमाणित बियाणे वितरण व बियाणे उत्पादनास अर्थसाहाय्य, एकात्मिक कीड व अन्नद्रव्ये व्यवस्थापन, सुधारित कृषी औजारे व सिंचन साधन, पीक पद्धतीवर आधारित प्रशिक्षण आदींचा समावेश आहे. शेतकऱ्यांचे शेतमालाच्या मूल्यवर्धनासाठी मिनी राइस मिल, मिनी दाल मिल (शेतकरी गटासाठी), बीज प्रक्रिया संच (FPO साठी), भातशेतीमध्ये मत्स्यपालन, तेलघाणी इ. घटकांची स्थानिक पुढाकाराच्या बाबींतर्गत अंमलबजावणी अभियान अंतर्गत केली जाणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत सन २०२१-२२ साठी अन्नधान्य पिकांसाठी रु. २२४८४.०० लाखांचा, गळीत धान्य व वृक्षजन्य तेलबिया पिकांसाठी रु. ७०६२.५५ लाखांचा आणि नगदी पिकांसाठी ७३९ लाख रुपयांचा कार्यक्रम मंजूर आहे.
महाडीबीटी पाेर्टलवर करावा लागणार अर्ज
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्य/गळीत धान्य/नगदी पिके सन २०२१-२२ अंतर्गत रब्बी हंगामामध्ये कडधान्य, गळीत धान्य व तृणधान्य पिकांचे अनुदानित दराने बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषी औजारे व सिंचन साधने या बाबींचे अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करून अर्ज करावेत. महाडीबीटी पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांमधून मंजूर कार्यक्रमाच्या मर्यादेत लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.
हा आहे याेजनेचा उद्देश
या योजनेचा उद्देश क्षेत्र विस्तार व उत्पादकतेमध्ये वाढ करून शेतकऱ्यांच्या उत्पादनात शाश्वत वाढ करणे, जमिनीची सुपीकता व उत्पादन क्षमता वाढविणे, शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे हा आहे. तसेच अपारंपरिक भातपड क्षेत्रावर कडधान्य / गळीत धान्य पिकाच्या क्षेत्र वृद्धी व उत्पादकतेत वाढ करणे हा आहे.