अधिकार नसताना तलाठ्याने वाढविले क्षेत्रफळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2021 11:19 AM2021-07-06T11:19:26+5:302021-07-06T11:19:52+5:30

Khamgoan News : खामगावात शासनाच्या फसवणूकीचा नवा फंडा एका तलाठ्याने शोधून काढला आहे.

Increased area by Talathi without authority! | अधिकार नसताना तलाठ्याने वाढविले क्षेत्रफळ!

अधिकार नसताना तलाठ्याने वाढविले क्षेत्रफळ!

Next

- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: मूळ मालक बदलवून, स्वत:च्या ताब्यातील दस्तवेजात खाडाखोड करून तब्बल ९४ जणांची कोट्यवधी रूपयांच्या फसवणूक प्रकरणानंतर, खामगावात शासनाच्या फसवणूकीचा नवा फंडा एका तलाठ्याने शोधून काढला आहे. चोपडेनंतर आता नवीन चोपडे कोण? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच, अधिकार नसतानाही क्षेत्रफळ दुरूस्ती केल्याने हा तर चोपडेचाही मास्टर मांईड अशी चर्चा महसूल वर्तुळात आता रंगू लागली आहे. क्षेत्रफळ वाढ केलेल्या भुखंड परिसरात  जमिनीचे भाव गगणाला भिडले आहेत. त्यामुळेच हा प्रकार करण्यात आल्याची जोरदार चर्चा शहरात होत आहे.
खामगाव तालुक्यातील मौजे जनुना येथील एकत्रिकरणाच्या तिसºया प्रतीमधील खाते नं. १३८ शेत सर्व्हे नं. १२/२ क्षेत्र ०.०१ गुंठा (नवीन गट नं.४० ) असून, महा-ई-सेवा केंद्रातून प्राप्त ७/१२ नक्कलनुसार १ गुंठा क्षेत्र राजेंद्रसिंह दुनियासिंह ठाकूर यांच्या नावे (पार्वताबाई ज. दुनियासिंह ठाकूर यांच्याकडून प्राप्त ) असल्याचे दिसून येते. मात्र, तलाठी बी.डी.आसनकर यांनी संगणकीय फेरफार (४६२८ दि. २१ मे २०१८) रोजी नोंद करीत या फेरफारमध्ये स्पष्टपणे नमूद केले की, प्रभारी मंडळ अधिकारी आवार/ जनुना कार्यालय/ ०१/१७१८/ आदेश दि. २७ एप्रिल २०१८ नुसार क्षेत्र ०.०१ गुंठाऐवजी ०.०५ गुंठा क्षेत्रफळाची दुरूस्ती केली. त्याचवेळी तत्कालीन मंडळ अधिकारी विनायक प्रभाकर महाजन यांनी आपल्या शेºयात नोंदणीकृत दस्तान्वये गावी फेरफार घेण्याबाबतचा आदेश पाहील्याचे नमूद केले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात विसंगती आढळून येत असून, जिल्हाधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाºयांच्या आदेशा वापरून तलाठी आसनकर यांनी क्षेत्रफळाची दुरूस्ती केल्याचे स्पष्ट होत आहे.

 
 ‘चोपडे’चाही मास्टरमांईड!
- शासकीय दस्तवेजात खाडाखोड आणि बनावट दस्तवेजाच्या आधारे  निलंबित तलाठी राजेश चोपडे याचे तब्बल १०० प्लॉटच्या खरेदी-विक्रीचे प्रकरण चांगलेच गाजले. त्यानंतर खामगाव महसूल विभागातील तलाठी बी.डी.आसनकर यांनी चक्क प्रभारी विनायक प्रभाकर महाजन यांच्या आदेशाने क्षेत्रफळाची दुरूस्ती केल्याचे समोर येत आहे. वस्तुस्थितीत, क्षेत्रफळ दुरूस्तीचे अधिकार उप विभागीय संचालक भूमी अभिलेख यांना आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची नि:पक्ष चौकशी करण्याची गरज असल्याचे समोर येत आहे. भुदान जमिनीच्या विना परवाना हस्तांतरण नोंदीचे प्रकरणी आसनकर यांची प्रशासकीय चौकशी सुरू आहे. त्याचवेळी आता क्षेत्रफळ वाढीचे प्रकरण समोर आले.

 
नि:पक्ष चौकशीची गरज!
- निलंबित तलाठी चोपडे याच्यानंतर तलाठी आसनकर यांचा  भूदान जमिन हस्तांतरण नोंदी आणि क्षेत्रफळ वाढीचा घोळ समोर येत आहे. बाळापूर फैलातील एका चारचाकी वाहनाच्या शोरूम नजीक असलेल्या जमिनीचे क्षेत्रफळ दुरूस्तीद्वारे आसनकर यांनी मोठा अर्थपूर्ण व्यवहार केल्याची चर्चा आहे. आसनकर तलाठी कार्यालयात पैसे घेतानाचा एक व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यामुळे याप्रकरणी वरिष्ठांकडून नि:पक्ष चौकशी तसेच फौजदारी कारवाई करणे गरजेचे आहे.


 
आधी मयत...नंतर वारसांना केले कमी!
- खामगाव तालुक्यातील टेंभूर्णा येथील प्लॉट नं. ११९ गट नं. २४/२ मध्ये मयत लवकेश सोनी यांची नोंद कमी करून वारसांना आणले. त्याचवेळी फेरफार क्रमांक ६९०० नुसार मंजूर वारसांना कमी करून मयताची नोंदणी करण्याचाही प्रताप याच तलाठ्याने केला आहे. हे येथे उल्लेखनिय!

 
- क्षेत्रफळ दुरूस्तीमुळे कुणाचे नुकसान झाले असल्यास त्यांनी तहसीलदारांकडे रितसर तक्रार करावी. याप्रकरणी योग्य ती चौकशी केली जाईल. गैरप्रकार घडला असल्यास संबंधितांवर कारवाई प्रस्तावित केली जाईल.
-राजेंद्र जाधव
उपविभागीय अधिकारी, खामगाव.

Web Title: Increased area by Talathi without authority!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.