पाणीटंचाईत विंधन विहिरींचा आधार
मेहकर: पाणी टंचाई निवारणार्थ जिल्ह्यातील अनेक गावांसाठी विंधन विहीर मंजूर करण्यात आल्या आहेत. मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख, हिवरा खु., पिंपळगाव उंडा, माळेगाव, वर्दडा, पेनटाकळी, अंबाशी, मोहखेड, पारखेड, उटी, नायगाव देशमुख, शेंदला, लव्हाळा, चिंचाळा या गावांना विंधन विहिरींचा आधार होत आहे.
महागाईच्या विरोधात सर्वसामान्यांमधून रोष
बुलडाणा : पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्याचबरोबर गॅसचे भाव देखील ९०० पर्यंत गेले आहेत. या महागाईच्या विरोधात सर्वसामान्यांमधून रोष व्यक्त होत आहे.
बुलडाणा तालुक्यात १० पॉझिटिव्ह
बुलडाणा : तालुक्यात १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. कोरोना बाधितांची संख्या आता कमी झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु अनेकजण बिनधास्तपणे विनामास्कच बाहेर पडत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांना दिले कोरोना ऋणनिर्देश मानपत्र
बुलडाणा : कोरोना काळात जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, उपकार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी राजेंद्र सांगळे, सहाय्यक माहिती अधिकारी निलेश तायडे यांची कामगिरी कौतुकास्पद असल्यामुळे त्यांना मेहकर तालुक्यातील गवंढाळा,कंबरखेड गट ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच ताई गजानन जाधव यांनी कोरोना ऋणनिर्देश मानपत्र देऊन सन्मानित केले. यावेळी संतोष अवसरमोल, गजानन जाधव उपस्थित होते.
बॉटलमध्ये पेट्रोल विक्रीला लगाम
सुलतानपूर : येथून जाणाऱ्या महामार्गावर बऱ्याच ठिकाणी पेट्रोलची खुलेआम अवैध विक्री करण्यात येत होती. बॉटलमध्ये हे पेट्रोल दिले जात होते. परंतु आता पेट्रोलचे भाव शंभरी पार गेल्याने पानटपऱ्यांवर होणाऱ्या बॉटल मधील पेट्रोल विक्रीला लगाम बसला आहे.
क्रीडा स्पर्धेचा अहवाल सादर करा
बुलडाणा : माध्यमिक, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेतील विद्यार्थ्यांना क्रीडा गुण सवलत करता अहवाल सादर करण्याचे आवाहन एकविध क्रीडा संघटना मार्फत करण्यात आले आहे. विविध खेळाच्या जिल्हा राज्य संघटनांनी संपूर्ण स्पर्धेचा अहवाल सादर करावा, असे आवाहनही जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांनी केले आहे.
रुग्णवाहिका दीड महिन्यापासून नादुरुस्त
बुलडाणा : प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या काही रुग्णवाहिका एक ते दीड महिन्यापासून नादुरूस्त आहेत. १०८ डायल करून उपलब्ध हाेणारी रुग्णवाहिकांची वेळेवर दुरूस्ती होत नसल्याने परिसरातील रुग्णांना खासगी वाहनाने रुग्णालय गाठावे लागत आहे.
बिजोत्पादनाला परतीच्या पावसाचा फटका
बुलडाणा : गेल्यावर्षी बुलडाणा जिल्ह्यात ११ हजार ५८३ हेक्टर क्षेत्रावर महाबीज अतंर्गत बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यात ५ हजार ६०० शेतकरी सहभागी झाले होते. मात्र, २०१९ आणि २०२० या दोन्ही वर्षात परतीच्या पावसाचा बिजोत्पादनाला फटका बसला आहे.
लसीकरणाचा टक्का वाढेना
बुलडाणा : कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम जिल्ह्यात सुरू होऊन आता जवळपास पाच महिने पूर्ण होत आहेत. या कालावधीत ४ लाख ४९ हजार ६४८ जणांना लस देण्यात आली आहे. लसीकरणाचा टक्का पाहिजे त्या प्रमाणात वाढत नसल्याचे दिसून येते.
कृषी केंद्र संचालकांचे नियोजन हुकले
लोणार : बियाण्यांच्या दरवाढीचा परिणाम शेतकऱ्यांसह कृषी केंद्र चालकांवर ही झाला आहे. मागील वर्षी सोयाबीनच्या उत्पादनात घट झाल्याने या खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा घटण्याची शक्यता आहे. भाववाढीमुळे बियाणे खरेदी करते वेळी दुकानदारांनाही विचार करावा लागत आहे.