पिकांमध्ये फुलगळचा वाढला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:40 AM2021-08-14T04:40:16+5:302021-08-14T04:40:16+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात ६ लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झालेली आहे. सध्या सोयाबीनसह इतर काही पिके फुले ...

Increased risk of flowering in crops | पिकांमध्ये फुलगळचा वाढला धोका

पिकांमध्ये फुलगळचा वाढला धोका

Next

बुलडाणा : जिल्ह्यात ६ लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झालेली आहे. सध्या सोयाबीनसह इतर काही पिके फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहेत. परंतु पावसाने ओढ दिल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. अनेक ठिकाणी जमिनीला भेगा पडल्याचे दिसून येत आहे. पाण्याअभावी पिकांवर फूलगळचा धोका वाढला आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकरी सिंचन करण्याची धडपड करीत आहेत. जिल्ह्यात मागील महिन्यात पावसाने चांगली हजेरी लावली होती. परंतु हा पाऊस सार्वत्रिक नव्हता, त्यामुळे मागील महिन्यातच पिकांना दमदार पावसाची आवश्यकता होती. त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीतील ओल अत्यंत कमी झालेली आहे. माळरानावरील पिकांनी तर माना टाकल्या आहेत. पिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने शेतकरी सिंचनाची व्यवस्था करत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था नाही, त्यांची पिके मात्र संकटात सापडली आहेत. कुठल्याही पिकाचे भरघोस उत्पादन मिळण्यासाठी पिकामध्ये अधिक फूलधारणा होणे महत्त्वाचे असते. परंतु पिकामध्ये फूलगळ झाल्यास त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. पिकांना पाणी कमी पडले, तर चांगली फूलधारणा होऊ शकत नाही. काही ठिकाणी फूलगळही होत असल्याचे दिसून येते.

शेंगा भरण्यास अडचणी

यंदा अनेक शेतकऱ्यांनी लवकर येणारी सोयाबीनची लागवड केली आहे. त्यामुळे सोयाबीन पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. परंतु या पिकांना पाण्याचा ताण बसल्याने सोयाबीनच्या शेंगा भरण्यास अडचणी येत आहेत. परिणामी उत्पादनात घट येण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

पिके तहानली, जमिनीला पडल्या भेगा

पावसाअभावी पिके तहानली आहेत, तर जमिनीलाही भेगा पडल्याचे चित्र आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने जमिनीला भेगा पडल्या आहेत. अशा शेतातील पिकांनी माना टाकल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या पिकांना आता पावसाची आवश्यकता आहे.

सध्या पाऊस लांबल्याने पिकांना पाणी देणे आवश्यक झाले आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने फूलगळ होऊ शकते. पिकांना सिंचन करताना काळजी घेणे आवश्यक आहे. पाणी २४ तास स्प्रिंक्लर चालू ठेवूनही देऊ नये. पाणी योग्य प्रमाणात द्यावे.

सी. पी. जायभाये, कृषी शास्त्रज्ज्ञ

जिल्ह्यात सर्वसाधारण पर्जन्यमानाच्या तुलनेत ४५.५८ टक्के पाऊस

बुलडाणा: ४२.०३ %

चिखली: ५६.३१ %

देऊळगाव राजा: ४९.९३ %

सिंदखेड राजा : ६५.१३ %

लोणार ५३.९४ %

मेहकर ७०.६४ %

खामगाव ५३.१७ %

शेगाव २८.०२ %

मलकापूर २७.७२ %

नांदुरा ३१.२५ %

मोताळा ३५.७९ %

संग्रामपूर ४५.८४ %

जळगाव जामोद २३.२८ %

६८२३०३

हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी

तूर ६८३१६.५०

मूग १७३२७.७०

उडीद १८२४६.६०

सोयाबीन ३६०९२०.४०

कपाशी १८७८७७.५०

Web Title: Increased risk of flowering in crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.