बुलढाणा: चीनमधील वर्ल्डकप दोनच्या स्पर्धेत मोठा उलटफेर करणाऱ्या बुलढाण्याच्या प्रथमेश जावकारसह भारताचा सहा सदस्यीय संघ जर्मनीसाठी शनिवारी रवाना झाला. जर्मनीतील बर्लिन येथे २७ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिप २०२३ ही स्पर्धा होत होत आहे. ऑलिम्पीकनंतरचा हा आर्चरीमधला सर्वात मोठा इव्हेंट म्हणून स्पर्धा गणल्या जाते. त्यामुळे या स्पर्धेतील कामगिरीकडे आता लक्ष लागून रहाले आहे.
भारताचा सहा सदस्यी संघ शनिवारी दिल्ली येथून जर्मनीसाठी रवाना झाला. या संघात प्रथमेश जावकार (बुलढाणा) आणि अेाजस देवतळे (नागपूर) हे दोघे विदर्भाचे खेळाडू आहेत. दरम्यान अभिषेक वर्मा (दिल्ली) हा यासंघातील तिसरा खेळाडू आहे. महिलांच्या संघामध्ये साताऱ्याची अदिती स्वामी, आंध्राची ज्योती सुरेखा वेन्नम आणि पंजाबची परणीत कौर यांचा समावेश आहे.
२७ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा होत असली तरी तेथील वातावरण, हवेचा वेग यासह अन्य परिस्थितीशी जुळवून घेण्याचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर रहाणार आहे. त्यानुषंगाने प्रारंभी भारतीय संघाचे आधी प्रशिक्षण शिबीर तेथे होत आहे. त्यामुळेच भारताचा संघ स्पर्धेआधीच १५ दिवस जर्मनीसाठी रवाना झाला आहे. या स्पर्धेमध्ये भारताच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून नुकताच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार (मार्गदर्शक) जाहीर झालेले बुलढाण्याचे प्रशिक्षक चंद्रकांत इलग हे काम पहात आहे. तेही संघासोबतच १५ जुलै रोजी दिल्लीवरून रवाना झाला आहेत.
मे महिन्यात चीनमधील शांघाय येथे आर्चरी वर्ल्डकप दोनमध्ये नेदरलँडच्या विश्वविजेत्या माइक श्लोएसरवर प्रथमेशने मात करून आर्चरीच्या जगतात खळबळ उडवून दिली होती. ही स्पर्धा झाल्यानंतर जर्मनीतील वर्ल्ड चम्पियनशिप आणि स्पटेंबरमध्ये चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्सवर लक्ष केंद्रीत केले असल्याचे प्रथमेश म्हणाला होता. त्यामुळे आता जर्मनीमधील स्पर्धेत भारताच्या यासंघाच्या कामगिरीकडे लक्ष लागून रहाले आहे.