बुलडाणा जिल्ह्यातील धोकादायक ठरणाऱ्या १८६ माती तलावांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 11:42 AM2021-02-02T11:42:12+5:302021-02-02T11:43:00+5:30
Buldhana News १८६ माती तलावांची तपासणी करण्यात येऊन यातील ६२ माती तलावांची प्राधान्यक्रमाने दुरुस्ती करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : प्रसंगी धोकादायक ठरू पाहणाऱ्या जिल्ह्यातील १८६ माती तलावांची तपासणी करण्यात येऊन यातील ६२ माती तलावांची प्राधान्यक्रमाने दुरुस्ती करण्यात येणार असून, त्यासाठी २६ कोटी रुपयांचा प्रस्ताव प्रादेशिक जलसंधारण अधिकारी कार्यालयामार्फत शासनस्तरावर मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेंतर्गतच्या तलावांच्या देखभाल दुरुस्तीसंदर्भाने उपस्थित झालेल्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर ही माहिती समोर आली आहे. धोरणात्मक निर्णयांतर्गत राज्यातील जुन्या तलवांची देखभाल दुरुस्ती करण्याच्या दृष्टीने मधल्या काळात जिल्हा परिषदेच्या मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील (ल.पा.) पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे, माती तलाव, सिंचन तलावांची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहणी करण्यात आली होती. काही तलावांवर मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली, तर काही तलावाच्या ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण होण्याची शक्यता पाहता तेथे दुरुस्ती करणे गरजेचे झाले आहे. यासोबतच काही ठिकाणी तलावाची भिंतही दबली गेली आहे.
परिणामी पावसाळ्यात प्रसंगी आपत्कालीन स्थिती निर्माण होण्याची शक्यता पाहता या तलावांची किंवा स्ट्रक्चरी दुरुस्ती करणे क्रमप्राप्त ठरत आहे. त्यासंदर्भाने शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार गेल्या वर्षी जिल्हा परिषदेंतर्गतच्या ८५१ अशा स्ट्रक्चरची पाहणी व तपासणी करण्यात आली. त्यातील धोकादायक ठरू पाहणाऱ्या किंवा प्रसंगी धोका निर्माण होण्याची शक्यता असलेल्या १८० तलावांच्या ठिकाणी अतिआवश्यक असलेल्या व तात्पुरत्या स्वरूपाच्या दुरुस्तीच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यातील अत्यावश्यक ठिकाणी त्वरित कामेही करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. सोबतच अन्य कामेही पावसाळ्यापूर्वी मार्गी लावण्यात येणार आहेत.
जाेरदार पावसामुळे सिंदखेड राजा तालुक्यातील अनेक तलाव फुटले हाेते. त्यामुळे पीके पाण्यात गेली हाेती. तलाव फुटू नये यासाठी प्रशासनाकडून उपाय याेजना करण्यात येणार आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
तीन टप्प्यांत होणार कामे
जिल्हा परिषदेंतर्गतची ही कामे तीन टप्प्यांत करण्यात येणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यात ६२, दुसऱ्या टप्प्यात १०१ व तिसऱ्या टप्प्यात ३५ ठिकाणची कामे केली जाणार आहेत. त्यानुषंगाने पहिल्या टप्प्यातील ६२ ठिकाणची कामे करण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली असून, त्यासाठी २६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे जिल्हा जलसंधारण अधिकारी पवन पाटील यांनी सांगितले.
चार उपविभागांत कामे
मृद व जलसंधारण विभागाच्या बुलडाणा उपविभागात २३, देऊळगाव राजा उपविभागात १०, खामगाव उपविभागात २२ आणि मेहकर उपविभागात सात कामे प्रस्तावित आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्यात आले असून, त्याला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. निधी उपलब्ध होताच ही कामे प्राधान्य क्रमाने मार्गी लावण्यात येतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले.