लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: द्विसदस्यीय केंद्रीय पथकाने सोमवारी खामगाव येथील कोविड रूग्णालयाला भेट दिली. यावेळी कोरोना विषाणू संसर्गाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच आॅक्सीजन पुरवठ्याचीही चाचपणी या पथकाने केलीबुलडाणा जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या रूग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या रूग्णसंख्येबाबत कारणीमिमांसा करण्यासोबतच बुलडाणा जिल्ह्यातील विविध शासकीय रूग्णालयातील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाचे दोन सदस्यीय पथक ८ एप्रिल रोजी बुलडाणा जिल्ह्यात दाखल झाले आहे. यामध्ये केंद्रीय पथकातील राष्ट्रीय रोग नियंत्रण नवी दिल्लीचे उपसंचालक डॉ. नवीन वर्मा, भुवनेश्वर आयुर्विज्ञान संस्थानमधील भूलतज्ज्ञ आंतर वैद्यकीय विभागातील सहा. प्राध्यापक डॉ. दृष्टी सुंदरदास यांचा समावेश आहे. केंद्रीय द्विसदस्यीय पथक सोमवारी खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयातील कोविड रूग्णालयात धडकले. रूग्णालयातील बेड, आॅक्सीजन आणि कोविड टेस्टींग लॅबचा आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार डॉ. शीतलकुमार रसाळ, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे, वैद्यकीय अधिक्षक सुरेश वानखडे, मुख्याधिकारी मनोहर अकोटकर, उपमुख्याधिकारी रविंद्र सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी दिनकर खिरोडकर, डॉ. शैलेश खंडारे आदी उपस्थित होते.
लसीकरणाची घेतली माहिती- केंद्रीय पथकातील सदस्यांनी कोविड संसर्ग परिस्थिती, कोरोना मृत्यू दर, पॉझिटिव्हीटी दर, दररोज होत असलेल्या तपासण्या, कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग आदिंची माहिती घेतली. कोविड नियंत्रणासाठी आवश्यक त्या सूचना अधिकाºयांना दिल्या. त्याचप्रमाणे पथकातील सदस्यांनी कोविड लसीकरणाचीही माहिती घेतली. लसीकरण सेंटरवरील सुविधा, कोविड रूग्णालयातील बेड, आॅक्सीजन बेड, आयसीयू युनीट, व्हेंटिलेटर आदींचाही आढावा यावेळी घेण्यात आला.
कोविड टेस्टींग लॅबबाबत व्यक्त केले समाधान!- खामगाव सारख्या तालुका स्तरावरील उपजिल्हा रूग्णालयात दातृत्वातून कोविड टेस्टिंग लॅबची उभारणी करण्यात आली आहे. तालुका स्तरावर कुठेच कोविड टेस्टिंग लॅब कार्यान्वित नसल्याचे अधोरेखीत करीत, खामगाव येथील कोविड टेस्टिंग लॅब आणि येथील सुविधांबाबत समितीने समाधान व्यक्त केले.