डोणगाव येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच मान्यता नसतानाही काही रुग्णालयांत कोरोनाबाधितांवर उपचार केले जात असल्याची चर्चा असल्यामुळे आरोग्य विभागाच्या या अधिकाऱ्यांनी ही तपासणी केली. या तपासणीदरम्यान येथे रेमडेसिविर इंजेक्शनही मिळते का? याचीही चौकशी करण्यात आली. डोणगावातील तीन खासगी रुग्णालयांची १९ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास या पथकाने तपासणी केली. दरम्यान, येथे रेमडेसिविर इंजेक्शन आढळून आले नसले तरी येथे नियमांना बगल दिली जात असल्याचे प्राथमिक पाहणीत समोर आले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या तीनही रुग्णालयांची पोलीस बंदोबस्तात तपासणी करण्यात आली. येथील तपासणीचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गवई यांनी सांगितले. खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णांची कोविड टेस्ट केल्याशिवाय अपवादात्मक परिस्थिती वगळता उपचार करू नये. तसेच संशयित रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड टेस्टसाठी पाठवावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
डोणगावमधील तीन रुग्णालयांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 4:34 AM