बुलडाणा/खामगाव : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाची साखळी खंडीत करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी देशभरात स्वयंस्फुर्तीने ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याच्या आवाहनला बुलडाणा व खामगाव शहरासह जिल्ह्यात सर्वत्र उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील तालुक्याच्या शहरासंह ग्रामीण भागात नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने बंद पाळून पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे.
एरवी पहाटे पाच वाजताच सुरू होणारे बुलडाणा २१ मार्चरोजी सायंकाफासूनच निर्मनुष्य होण्यास प्रारंभ झाला होता. २२ मार्च रोजी जिजामाता प्रेक्षागार, जिजामाता महाविद्यालयाच्या मैदानावर मॉर्निंग वॉकसाठी जाणारेही घरीच थांबले होते. रविवारचा आठवडी बाजार बंद आहे. त्यामुळे सकाळी होणारी हर्राशीही होऊ शकली नाही. बुलडाणा शहरातील सर्व आस्थापना बंद आहेत. त्यामुळे दैनंदिन व्यवहार बंद आहेत.रविवार बुलडाण्याचा आठवडी बाजार असतो. ३१ मार्च पर्यंत आठवडी बाजार बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिले आहेत. त्यामुळे बुलडाणा शहरासह पंचक्रोषीतील गावांचे अर्थकारण चालणारा बुलडाण्याच्या आठवडी बाजारातही शुकशुगाट होता. सकाळी सात वाजल्यापासून हे चित्र कायम होते.बुलडाणा शहरातील धाड नाका ते जयस्तंभ चौक, जयस्तंभ चौक ते आरटीओ आॅफीस, जयस्तंभ चौक ते येळगाव, जस्तंभ चौक ते बोथा रोडसह आठवडी बाजार रस्ता यासह वाहतूक केंद्रीभूत झालेले महत्त्वाचे रस्ते निर्मनुष्य झालेले दिसत आहेत.कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेलेल्या पोलिस प्रशासनातील वाहतूक पोलिस स्टेट बँक चौकात कर्तव्यावर असल्याचे चित्र सोडल्यास संपूर्ण बुलडाणा जिल्हाच लॉक डाऊन झाल्याचे चित्र आहे.
खामगावात जोरदार प्रतिसादखामगाव: खामगावात रविवारी सकाळपासूनच जनता कर्फ्यूला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सकाळी ७ वाजतापासून खामगावातील बाजारपेठेसह संपूर्ण खामगाव शहर बंद आहे. जनता संचार बंदीच्या अनुषंगाने शनिवारी देखील काही व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठान बंद ठेवली होती. रविवारी या बंदमध्ये किरकोळ व्यावसायिक आणि सामान्य नागरिक सहभागी झाले. त्यामुळे जनता कर्फ्यू १००% यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे.संतनगरी शांत...गल्लीबोळातही शुकशुकाटशेगाव : दर दिवशी दहा हजारांहून अधिक लोकांचे येणे जाणे असलेली संतनगरी शेगावातही जनता कर्फ्यूला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शेगावात मुख्य बाजारपेठ,मुख्य मार्ग तसेच गल्लीबोळातून ही कोणीही बाहेर फिरकतांना दिसत नाही. शहरात सगळीकडे शुकशुकाट दिसून येत आहे.