केवळ गणनाच! संरक्षणाचे काय?
By admin | Published: May 4, 2015 01:13 AM2015-05-04T01:13:24+5:302015-05-04T01:13:24+5:30
ज्ञानगंगा अभयारण्यात आज वन्यजीव प्रगणना.
सिद्धार्थ आराख / बुलडाणा : दरवर्षी मे महिन्यात येणार्या बुद्ध पौर्णिमेला अभयारण्यातील वन्यप्राण्यांची गणना होते. यावर्षी वनविभागाकडून सोमवारी ही गणना होत आहे.; मात्र अभयारण्यातील वन्यजिवांची गणना चालेल का, त्यांच्या संरक्षणाचे काय, असा प्रश्न वनजीवप्रेमींना पडला आहे. बुलडाणा शहरापासून १२ कि.मी., तर खामगावपासून २५ कि.मी. अंतरावर अजिंठा पर्वतरांगेत २0५ चौ. कि.मी. क्षेत्रावर ज्ञानगंगा अभयारण्य विस्तारलेले आहे. येथे रानडुक्कर, अस्वल, तडस, बिबट, कोल्हे, लांडगा, रोही, ससा, मोर यांचा अधिवास येथे आहे. साग, अंजन, सालई खैर यांसह विविध दुर्मीळ वनस्पती येथे आढळतात. समृद्ध जैवविविधता हे या अभयारण्याचे वैशिष्ट्य आहे. तथापि, वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, नागरीकरण व वाढलेली वाहने यामुळे वन्यजिवांना धोका निर्माण झाला आहे. ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणार्या रस्त्यावर जड वाहनांमुळे अपघात होऊन वन्य प्राण्यांच्या अधिवास व जिवास धोका निर्माण झाला आहे. सहा महिन्यांपूर्वी व यावर्षी जानेवारी महिन्यात गर्भवती बिबट मादी ठार झाल्याच्या घटना ताज्याच आहे.