करडी तेलाच्या दराने गाठले द्विशतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 03:13 PM2019-12-16T15:13:27+5:302019-12-16T15:13:35+5:30

नवीन करडी बाजारात येण्यास आणखी दोन महिन्यांचा अवधी असल्याने करडी तेल २५० रुपयांपर्यंत पोहोचेल असा अंदाज तेल विक्रेत्यांनी व्यक्त केला.

Kardai oil rate cross 200 rs | करडी तेलाच्या दराने गाठले द्विशतक

करडी तेलाच्या दराने गाठले द्विशतक

googlenewsNext

- सोहम घाडगे  
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गतवर्षी दुष्काळामुळे करडीचा पेरा कमी झाल्याने उत्पादनात घट आली. त्याचा सरळ परिणाम करडी तेलाच्या भाववाढीवर झाला आहे. सध्या करडी तेल २२० रुपये लिटरने विक्री होत आहे. नवीन करडी बाजारात येण्यास आणखी दोन महिन्यांचा अवधी असल्याने करडी तेल २५० रुपयांपर्यंत पोहोचेल असा अंदाज तेल विक्रेत्यांनी व्यक्त केला.
खाद्यतेल हा स्वयंपाकातील महत्वाचा पदार्थ आहे. किचनमध्ये तेलाच्या कॅटलीस वेगळीच जागा असते. कमी प्रमाणात का होईना मात्र प्रत्येक घरात तेलाचा वापर होतोच. भाजी असो वा खाण्यातील अनेक पदार्थ तेलाशिवाय बनत नाहीत. त्यामुळे खाद्यतेलाचे भाव वाढले की, त्याचा परिणाम गृहिणींच्या बजेटवर होतो. यावर्षी खाद्यतेलाचे भाव नवनवीन उच्चांक गाठत आहेत. खाण्यात करडीचे तेल चांगले असते. करडी तेलाच्या सुगंधावरुनच त्याची पारख होते. सध्या करडी तेल २२० रुपये लिटरने विक्री होत आहे. पामतेल, सोयाबीन, शेंगदाणा व सरकी तेलाचेही दर वाढले आहेत. खरीप हंगामात पिकांना बसलेला फटका व विदेशी पामतेलाचा देशातील कमी झालेला साठा यामुळे महागाई वाढल्याचे बोलले जात आहे.
दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात नवीन करडी तेलाची आवक सुरु होते. मात्र मागील रब्बी हंगामात दुष्काळामुळे करडीचा पेरा कमी झाल्याने उत्पादन घटले. यंदा तब्बल साडेतीन महिने उशिराने करडी तेल बाजारात दाखल झाले. जून महिन्यापासून करडी तेलाच्या भाववाढीला सुरुवात झाली. दर महिन्याला करडी तेल नवीन उच्चांक गाठत आहे. करडी तेल महाग होत असून २२० रुपये लिटर विक्री होत आहे. नवीन करडी येण्यास आणखी दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. यामुळे २५० रुपयांपर्यंत भाव जाऊन पोहोचेल, असा अंदाज व्रिकेत्यांनी व्यक्त केला.
किरकोळ व्रिकीत आठवड्यात ५ रुपयांनी पामतेल महागले आहे. सध्या ८० रुपये लिटरने विक्री सुरु आहे. खरिपातील नवीन सोयाबीन १५ ते २० नोव्हेंबरदरम्यान बाजारात येत असते. मात्र यावर्षी परतीच्या पावसाने फटका दिल्याने सोयाबीन खराब झाले आहे. दिवाळीपासून आजपर्यंत होलसेलमध्ये तेल ९ रुपयांनी महागले. सध्या सोयाबीन तेल ९९ रुपये तर शेंगदाणा तेलाचे भाव १५० रुपयांवर पोहोचले आहे.
अलिकडील काळात करडी पिकाचा पेराही कमी झाला आहे. त्याचाही परिणाम या भाववाढीवर झालेला आहे. सातत्याने तेलाच्या किंमती वाढत असून कधी काळी शेंगदाण्याचे तेल सर्वात महाग गणल्या जात होते. मात्र आता त्याची जागा करडीच्या तेलाने घेतली आहे. ग्रामीण भागात आजही करडीचे तेल दैनंदिनस्तरावर स्वयंपाकघरात वापरण्यात येते. वाढलेल भाव पाहता स्वयंपाक घरातील फोडणीच्या तडक्याची किंमतही त्यामुळे वाढली आहे.

 


गतवर्षी दुष्काळामुळे कमी झालेला करडीचा पेरा व यावर्षी परतीच्या पावसाने खरिप पिकांचे झालेल्या नुकसानामुळे करडी, सोयाबीनची आवक घटली. त्यामुळे खाद्यतेलाच्या किंमती वाढल्या. सध्या करडी तेल २२० रुपये, सोयाबीन ९९ तर शेंगदाणा १५० रुपये लिटरने विक्री सुरु आहे.
- आदित्य कोठारी
विक्रेता, बुलडाणा

Web Title: Kardai oil rate cross 200 rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.