- नारायण सावतकारलोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल : कोरोनाच्या जागतिक महामारीने सर्व जग भयभीत झाले असतांना या महामारीच्या लढ्यात संग्रामपूर तालुक्यातील एक महिला डॉक्टर रुग्णांना वाचविण्यासाठी घाटकोपरच्या रुग्णालयात सेवा देत आहे. या महिला डॉक्टर चे नाव आहे कु. कविता जयप्रकाश इंगळे आहे. एमबीबीएस झाल्यानंतर एम.डी.चे पुढील शिक्षण घेत असतानाच आरोग्य मंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तिने अर्धवट शिक्षण सोडून रुग्णसेवा करण्याचा निर्णय घेतला.कोरोनाशी लढतांना तिची सुद्धा दोनदा कोरोना चाचणी झाली. मात्र चाचणी निगेटिव्ह आल्याने आत्मविश्वास वाढल्याचे ती सांगते. जागतिक महामारीने सर्व जग भयभीत झाले आहे. डॉक्टरांची यामध्ये महत्वाची भूमिका आहे. डॉ. कविता ही सैन्यदलातून निवृत्त झालेल्या जयप्रकाश नामदेव इंगळे यांची मुलगी आहे. जिवापेक्षाही देश महत्वाचा आहे ही शिकवण तिला लहानपणापासूनच मिळाली. अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस शिक्षणक्रम पूर्ण झाल्यानतर तिने राजवाडी रुग्णालयात प्रवेश घेतला. एमडीच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत असतानाच देशात कोरोनाने प्रवेश केला यानंतर तो राज्यात शिरला. मुंबईमध्ये कोरोनाचा प्रकोप झाला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा कसोशीने प्रयत्न करीत आहेत. यात डॉ.कविताचाही सहभाग आहे. ही संग्रामपूर तालुक्यासाठी भुषणावह बाब आहे.
आधी रुग्णसेवा नंतर शिक्षणडॉ. कविता म्हणते, आधी रुग्णसेवा महत्त्वाची आहे. संपूर्ण देश सध्या कोरोनाशी लढा देत आहे. रुग्णसेवा आधी महत्वाची आहे. शिक्षण काय कधीही पूर्ण होईल. कोरोनाने बरेच काही शिकवले. कोरोनाच्या या विषाणूला आपल्या माय भूमीतून हद्दपार करणे अधिक महत्वाचे आहे. कोरोना रुग्णांशी थेट संपर्क येत असल्याने आम्हालाही लागण होण्याचा फार मोठा धोका आहे. म्हणून वैद्यकीय यंत्रणेत काम करणाऱ्या माझ्यासह सर्वच कर्मचाऱ्यांची आतापर्यंत दोनदा कोरोना चाचणी झाली आहे. आमचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने अधिकच हिंमत वाढली आहे. अशाप्रकारे प्रत्येक डॉक्टराने कोरोना लढ्यात सहभागी होऊन त्याला हद्दपार करणे आवश्यक आहे. यादरम्यान डॉक्टरांनीही स्वत: ची काळजी घेण्याचे आवाहन कविताने केले आहे.