खामगावात पालिकेच्या व्यापारी गाळ्याचे भिजत घोंगडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 01:34 AM2017-12-11T01:34:46+5:302017-12-11T01:34:59+5:30
खामगाव: जिल्ह्यातील सर्वात मोठय़ा खामगाव नगरपालिकेवर बहुमताने घेतलेला ठराव परत घेण्याची नामुश्की ओढवली असून, त्या दृष्टिकोनातून पालिकेने तयारी चालविल्याची माहिती आहे. खामगाव पालिकेने निर्माण केलेल्या व्यापारी संकुलातील २९ दुकानांबाबत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात एकमत होत नाही. त्यामुळे बहुमताने पारित असलेला ठराव आता परत घेण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: जिल्ह्यातील सर्वात मोठय़ा खामगाव नगरपालिकेवर बहुमताने घेतलेला ठराव परत घेण्याची नामुश्की ओढवली असून, त्या दृष्टिकोनातून पालिकेने तयारी चालविल्याची माहिती आहे. खामगाव पालिकेने निर्माण केलेल्या व्यापारी संकुलातील २९ दुकानांबाबत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात एकमत होत नाही. त्यामुळे बहुमताने पारित असलेला ठराव आता परत घेण्यात येणार आहे.
शहरातील मोक्याच्या जागेवर व्यापारी संकुलाची निर्मिती करण्यात आली. व्यापारी संकुल निर्माण झाल्यानंतर गेल्या चार वर्षांपासून भाडेतत्त्वावर देण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत होत नाही. दरम्यान, खामगाव पालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी व्यापारी संकुल भाडेतत्त्वावर देण्यासाठी ठराव संमत करण्यात आला. बहुमताने संमत झालेल्या या ठरावाला विरोधकांनी विरोध चालविला आहे. त्यामुळे दोन-तृतीयांश बहुमतापासून हा ठराव कोसोदूर असल्याने, व्यापारी संकुलातील गाळे भाड्याने देण्याचा ठराव तांत्रिक अडचणीत सापडला आहे. परिणामी, हा ठराव मागे घेण्याच्या हालचाली चालविल्या आहेत.
खामगाव पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान!
नगरपालिका प्रशासनाच्यावतीने नगरपालिकेच्या जुन्या प्रशासकीय इमारतीच्या मागील बाजूस २९ गाळे असलेल्या व्यापारी संकुलाची निर्मिती करण्यात आली आहे; मात्र निर्मितीपासूनच वादाच्या भोवर्यात सापडलेल्या व्यापारी संकुलाचे ग्रहण नजीकच्या काळात सुटणार नसल्याचे दिसते. या व्यापारी संकुलातील दुकाने भाडेतत्त्वावर देण्यासाठी दोन-तृतीयांश बहुमताची आवश्यकता आहे. काँग्रेस आणि भाजपच्या सत्ताकाळात बहुमताने हा ठराव संमत होतो. मात्र, दोन तृतीयांश बहुमत मिळत नसल्याने हा ठराव अधांतरी राहत आहे. परिणामी, व्यापारी संकुलातील गाळ्यांची अनामत रक्कम, भाडे आणि अनामत रकमेचे व्याज असे एकूण वर्षाकाठी सुमारे चार कोटी रुपयांचे पालिकेचे नुकसान होत आहे.
खामगाव पालिकेपेक्षा जळगाव अग्रेसर!
खामगाव नगरपालिकेच्या कितीतरी वर्षांनंतर जळगाव नगरपालिकेच्यावतीने जळगाव जामोद येथे व्यापारी संकुलाची निर्मिती करण्यात आली आहे. खामगाव येथे व्यापारी संकुल बांधून तयार असताना, जळगाव येथे व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरू झाले. बांधकामानंतर लगेचच जळगाव पालिकेने ठराव संमत करीत, जळगाव येथील व्यापारी संकुल भाडेतत्त्वावर देण्यासही सुरुवात केली आहे. त्यामुळे खामगाव पालिकेपेक्षा जळगाव पालिका या कामी अग्रेसर असल्याचे दिसून येते.
खामगाव नगरपालिकेत विरोधाला विरोध ही प्रवृत्ती बळावत आहे. व्यापारी संकुलातील दुकाने भाड्याने देण्याचा ठराव तांत्रिकदृष्ट्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून सदर ठराव पारित करण्यात येणार आहे.
- ओम शर्मा, नगरसेवक, भाजप.