खामगाव: विविध न्याय मागण्यांसाठी नगर पालिका कर्मचारी मंगळवार १५ जुलै पासून संपावर गेले आहेत. कर्मचार्यांच्या या संपामुळे पालिकेतील अनेक विभाग सामसूम असल्याचे चित्र आज बुधवारी दिसून आले. पालिके तील ४0२ पैकी सुमारे १८0 कर्मचारी संपावर गेल्यामुळे प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले आहे. सामान्य प्रशासन, कर, शिक्षण , आस्थापना, विद्युत आदी विभागाचे कर्मचारी संपावर गेल्यामुळे हे कार्यालय ओस पडले होते. पालिकेच्या आवारातही आज कमालिची शांतता पसरली होती. नगर पालिका कर्मचारी व सेवानवृत्त कर्मचार्यांची सहाव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम त्वरीत अदा करण्यात यावी, कर्मचार्यांच्या वेतनासाठी शंभरटक्के अनुदान देण्यात यावे, नगर पालिकेतील अनुकंपाधारकास तात्काळ नियुक्ती देण्यात यावी, सफाई कामगारांना मोफत घरे बांधून देण्यात यावा, नगर पालिका कर्मचार्यांना कालबध्द पदोन्नती तात्काळ लागू करावी, कर्तव्य बजावताना अपंगत्व आलेल्या कर्मचार्यांना व अपंग कर्मचार्यांना विशेष लाभ देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी नगर पालिका कर्मचारी संपावर गेले आहेत. त्याचप्रमाणे १८ जुलैपर्यंंंत तोडगा न निघाल्यास पाणी पुरवठा, अग्निशमन, नगर पालिका दवाखाना या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही संपावर जाणार असल्याचा इशारा खामगाव नगर पालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आनंद अहीर यांनी दिला आहे. जळगाव जामोद : राज्य संघटनेच्या आवाहनानुसार विविध मागण्या संदर्भात सुरू असलेल्या नगर परिषद कर्मचार्यांच्या संपात जळगाव जामोद नगर परिषदचे तसेच संवर्ग कर्मचारी सहभागी झाले असून या संपामुळे नागरीकांची कामे खोळंबली आहे.नगर परिषद समोर मंडप टाकुन कर्मचार्यांनी संपात सहभागी होवून धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प आहे. या संपा त स्थानिक नगर परिषदेमधील बि.के. मोकळ, पी.व्ही. गावंडे, डी.जी. राजपूत, ए.एस. इंगळे, के.एन. भुते, जी.एन. हिस्सल, आर.आर. चंडाले, एम.एम. हक, कुरेशी, ढोले, देशमुख, डि.जे. डोंगरे, ढगे, इंगळे, भारसाकळे, ताहेर आदी विविध विभागातील कर्मचार्यांचा सहभाग आहे. याशिवाय मुख्याधिकारी बरेच दिवसापासून सुटीवर असल्याने शहरातील मुलभूत सुविधा, तक्रारी, समस्या निवारण, दाखले अशा विविध कामासाठी नगर परिषदमध्ये येणार्या शहरवासियांना कार्यालयात कोणीही कर्मचारी दिसत नसल्याने त्यांची कामे होत नाही. त्यामुळे पालिकेतील कामकाज ठप्प होवून नागरीक त्रस्त झाले आहेत.
खामगाव व जळगाव जामोद नगर परिषद कर्मचारी संपावर
By admin | Published: July 17, 2014 12:42 AM