खामगाव बसस्थानक बनले असुविधांचे माहेरघर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 04:56 PM2019-04-03T16:56:35+5:302019-04-03T16:56:41+5:30

खामगाव : येथील बसस्थानकामध्ये अनेक सुविधांचा अभाव दिसून येत आहे. ऐन उन्हाळ्याच्या काळात बसस्थानकातील सर्व पंखे बंद असल्याने प्रवाशांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

Khamgaon bus station becomes a house of problems | खामगाव बसस्थानक बनले असुविधांचे माहेरघर!

खामगाव बसस्थानक बनले असुविधांचे माहेरघर!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : येथील बसस्थानकामध्ये अनेक सुविधांचा अभाव दिसून येत आहे. ऐन उन्हाळ्याच्या काळात बसस्थानकातील सर्व पंखे बंद असल्याने प्रवाशांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तर प्रवाशांच्या मनोरंजनासाठी लावण्यात आलेली एलसीडी टिव्ही काढून टाकण्यात आली आहे.
खामगाव बस हे मध्यवर्ती बसस्थानक आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रवाशांची गर्दी दिसून येते. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद वाक्य घेवून सेवेत असलेल्या परिवहन मंडळाकडून मात्र प्रवाशांना कुठलीच सुविधा पुरविल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. सध्या खामगाव शहराचे तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सीअस पर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे नागरीकांच्या जिवाची लाही-लाही होत आहे. त्यातच येथील बसस्थानकामधील सर्वच पंखे बंद असल्याने प्रवाशांना उकाड्याचा भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळा लागण्याच्या अगोदरच बसस्थानकातील पंखे स्थानक प्रशासनाकडून दुरूस्त करणे गरजेचे होते. परंतु याकडे आगार प्रमुख आणि नियंत्रकांचे कुठलेच लक्ष नसल्याचे समजते. स्थानकात एकुण १५ ते १६ पंखे लावण्यात आलेले आहेत. त्यापैकी १२ पंखे बंद असून ४ ते ५ पंखे गायब असल्याचे निदर्शनास आले. याचबरोबर बसस्थानकात प्रवाशांच्या मनोरंजनासाठी लावण्यात आलेली एलसीडी टिव्ही अनेक दिवसापासून गायब झालेली आहे. याकडेही बसस्थानक प्रशासनाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. खामगाव बसस्थानकाला दरवर्षी कोट्यावधीचे उत्पन्न प्रवाशांकडून मिळत आहे. परंतु त्या मानाने कुठल्याच सुविधा मिळत नसल्याची ओरड प्रवाशांकडून होत आहे. तरी बसस्थानक प्रशासनाने तातडीने पंखे दुरूस्त करून प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी प्रवाशी वर्गाकडून होत आहे.
 
महिलांचे शौचालय रात्री असते बंद
बसस्थानकातील महिलांचे शौचालय रात्रीच्या वेळेस बंद असल्याने महिला प्रवाशांची गैरसोय होत आहे. शौचालय बंद असल्याने महिला प्रवाशांना रात्री उघड्यावरच अंधाराचा सहारा घ्यावा लागत आहे. त्यामुळे महिलांची कुचंबना होत असल्याची ओरड महिला प्रवाशांकडून होत आहे.
नियंत्रण कक्षातील पंखा सुरू
बसस्थानकातील नियंत्रण कक्षात बसलेल्या कर्मचाऱ्यांचाच पंखा सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. तर प्रवाशांसाठी लावण्यात आलेले पंखे बंद असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केल्या जात आहे.

Web Title: Khamgaon bus station becomes a house of problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.