खामगाव : ‘उत्पादक ते ग्राहक’ संकल्पनेला वाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 11:52 AM2020-04-26T11:52:31+5:302020-04-26T11:52:41+5:30
शेतमाल विक्रीचा प्रश्न सुटून ग्राहकांनाही स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : सध्या सगळीकडे कोरोना व्हायरसमुळे 'लॉकडाऊन' आहे. यामुळे पहिल्यांदाच शेतमाल उत्पादक ते ग्राहक अशा संकल्पनेला वाव मिळत असल्याचे चित्र आहे. शेतकरी त्यांचा माल थेट ग्राहकांना विकत आहेत. त्यामुळे कमिशनखोरीला आळा बसला असल्याचे दिसून येते.
कोरोना आजाराच्या पृष्ठभुमिवर गत २४ मार्चपासून लॉकडाउन जाहिर करण्यात आले. परिणामी वाहतूक व्यवस्था प्रभावित झाली. यात जास्त काळ टिकू न शकणाऱ्या भाजीपाला, फळ उत्पादनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होवू लागले. यातच कृषी विभागाच्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी त्यांचा माल थेट ग्राहकांना विकण्यावर भर दिला. यातून शेतमाल विक्रीचा प्रश्न सुटून ग्राहकांनाही स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध झाला.
व्यवसायामध्ये रूची वाढली!
नेहमी शेतकरी त्यांचा शेतमाल हर्राशीत विकतात. यानंतर व्यापारी तोच माल चढ्या दराने ग्राहकांना विकतात. यामुळे शेतकºयांना कमी भाव मिळून ग्राहकांना मात्र जास्त किंमत मोजून खरेदी करावी लागते. परंतु लॉकडाउनमुळे हर्राशी बंद झाली आणि शेतकºयांना त्यांचा माल ग्राहकांना विकावा लागला. यातून शेतकरी, ग्राहक दोघांचाही फायदा झाला. शेतकºयांना हर्राशीपेक्षा जास्त भाव मिळाला. कमिशनखोरीला आळा बसल्याने ग्राहकांनाही नेहमीपेक्षा स्वस्त दरात भाजीपाला मिळाला. या सर्व प्रक्रियेत शेतकºयांना व्यवसाय करण्याची संधी मिळाली असून त्यांची रूची वाढते आहे.