खामगाव पालिकेच्या सभेवर विरोधकांचा बहिष्कार; आरोप-प्रत्यारोपाने गाजली सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 06:49 PM2018-01-19T18:49:23+5:302018-01-19T18:54:29+5:30
खामगाव: खास सभेच्या सुचनेचा मुद्दा उपस्थित करीत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पालिकेच्या सभेवर बहिष्कार टाकला. तीव्र निदर्शने आणि नारेबाजी करीत विरोधकांनी सभागृह सोडले. त्यामुळे शुक्रवारी काहीकाळ पालिकेत गोंधळ निर्माण झाला होता.
खामगाव: खास सभेच्या सुचनेचा मुद्दा उपस्थित करीत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पालिकेच्या सभेवर बहिष्कार टाकला. तीव्र निदर्शने आणि नारेबाजी करीत विरोधकांनी सभागृह सोडले. त्यामुळे शुक्रवारी काहीकाळ पालिकेत गोंधळ निर्माण झाला होता.
शहरातील विविध विकास कामांना मंजुरी देण्यासाठी १९ विषयांची सूची असलेली खास सभा शुक्रवारी बोलाविण्यात आली. या सभेची सुचना ३ दिवस अगोदर न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित करून विरोधी पक्षाच्यावतीने सभागृहात आवाज उठविण्यात आला. सभाशास्त्रांच्या नियमांचे उल्लंघन करून आयोजित सभा पूर्णत: बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत, काँग्रेस नगरसेवकांनी सभागृह सोडले. सभागृहाबाहेर पडल्यानंतर नगरसेवकांनी पालिका आवारात तीव्र निदर्शने केली. त्यामुळे पालिकेत काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान, विरोधकांच्या बर्हिगमनानंतर अवघ्या पाच मिनिटांमध्ये पालिकेची सभा पार पडली. या सभेत विषय सुचीवरील १९ आणि एका वेळेवरील विषयाला मंजुरी देण्यात आली. सभेला सुरूवात झाल्यानंतर काँग्रेस गटनेत्या अर्चनाताई टाले आणि नगरसेवक अमय सानंदा यांनी सभेचा मुद्दा उपस्थित केला. नगराध्यक्ष तथा पिठासीन अधिकारी अनिताताई डवरे यांनी विरोधी सदस्यांचा मुद्दा खोडून काढल्यानंतर विरोधी नगरसेवक सभागृहाबाहेर पडले.
झेंडावंदनास पालिकेची पूर्व परवानगी आवश्यक!
जिल्हास्तरीय नगरोत्थान योजनेतंर्गत आलेल्या निविदा तसेच, राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेतंर्गत पीएमसीकरीता आलेल्या निविदांसोबत इतर २० विषयांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये पालिकेच्या मालकीच्या सार्वजनिक जागेवर पालिकेची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय झेंडावंदन घेवू नये, असा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. उपरोक्त ठराव पाणी पुरवठा सभापती ओम शर्मा यांनी मांडला. या ठरावाला नगरसेवक सतिशआप्पा दुडे यांनी अनुमोदन दिले.