खामगाव : शहरातील नाल्या साफसफाईसाठी अतिरिक्त खासगी मनुष्यबळाकडून सेवा घेण्याच्या ठरावाला पालिकेच्या सभेत सोमवारी मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आगामी काळात शहरातील स्वच्छतेसाठी पालिकेत उपलब्ध मनुष्य बळाचा (सफाई कामगारांचा) तर नाल्यांची स्वच्छता करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाचा (खासगी) वापर केला जाईल. ही बाब जवळपास निश्चित झाली आहे.खामगाव शहरातील नाल्या साफसफाईकरीता मनुष्यबळ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्थायी समितीने १० जून रोजीच्या सभेत शिफारस केली. त्यानुसार १ जुलै रोजीच्या सर्वसाधारण सभेत हा विषय ठेवण्यात आला. सभेत चर्चेअंती शहरातील नाल्या साफसफाईकरीता १०० जणांची मनुष्यबळ सेवा घेण्याच्या ठरावाला सभेत मंजुरी देण्यात आली. या ठरावानुसार शहरातील प्रभाग निहाय प्रत्येकी ०७ अशी खासगी मनुष्यबळ सेवा घेतली जाईल. या विषयाच्या बाजूने सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांसह विरोधी पक्षाचे नगरसेवक विजय वानखडे यांनी अनुकुलता दर्शविली. तर काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी विरोध दर्शविला. शहरातील विविध विषयांना मंजुरी देण्यासाठी सोमवारी पालिका सभागृहात सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत विषय सूचीवर २२ विषय होते. यापैकी ०२ विषय तांत्रिक कारणामुळे पुढील सभेत ठेवण्यात आले. तर १८ विषयांना सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर पारीत केले. या १८ विषयांना विरोधकांनी विरोध दर्शविला. या सभेला पिठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष अनिता डवरे, उपाध्यक्ष संजय मुन्नापुरवार, मुख्याधिकारी धनंजय बोरीकर उपस्थित होते.पालिकेच्या वाहनांवर लागणार जीपीएस यंत्रणा!पालिकेच्या सर्व वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्याच्या महत्वपूर्ण ठरावाला देखील यावेळी मंजुरी देण्यात आली. पालिकेच्या अद्ययावत कचरा संकलन करणाºया गाड्या सोबतच मडपंप, पाण्याचे टँकर आणि अग्नीशमन गाड्यांवरही जीपीएस यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्याचा विषय नगरसेवक सतीशआप्पा दुडे यांनी लावून धरला.