coronavirus : खामगावचा शिक्षकही ‘त्या’ मृत व्यक्तीच्या संपर्कात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 02:38 PM2020-03-31T14:38:43+5:302020-03-31T17:23:09+5:30
खामगावचा शिक्षकही ‘त्या’ मृत व्यक्तीच्या संपर्कात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या खामगाव येथील एकास वैद्यकीय तपासणीसाठी बुलडाणा येथे नेण्यात आले आहे. तसेच त्याच्या कुटुंबातील तिघांना बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे. हा व्यक्ती खामगाव येथील सजनपूरी भागातील रहिवाशी असून व्यवसायाने शिक्षक असल्याचे कळते. या कारवाईनंतर खामगावातील सजनपुरी भाग सील करण्यात आला आहे.
दोन दिवसापूर्वीच बुलडाणा येथील एका शिक्षकाचा कोरोना विषाणूच्या संसगार्ने मृत्यू झाला. त्याच्या दफनविधीनंतर अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला. या घटनेनंतर त्याच्या संपर्कात आलेल्या ६५ वर्षीय वृद्धास व १४ वर्षीय बालिकेस कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल ३१ मार्चरोजी प्राप्त झाला. दरम्यान मंगळवारी दुपारी दीड वाजता खामगाव येथील एक शिक्षक मृत व्यक्तीच्या संपर्कात आल्याची माहिती प्रशासनास मिळाली. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेने तत्काळ पोलिसांची मदत घेवून संबधित व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबातील दोघांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले आहे. बुलडाणा येथील सामान्य रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात त्यांना ठेवण्यात आल्याची माहिती आहे. खामगाव येथील सजनपूरी भागातील हा व्यक्ती रहिवाशी असून शिक्षक असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
सजनपुरी परिसर सील!
सजनपुरी भागातील तिघांना बुलडाणा येथे हलविण्यात आले. त्यानंतर संपूर्ण सजनपुरी परिसर सील करण्यात आला आहे. नगर पालिका पथकाकडून या परिसरात द्रावणाची फवारणी करण्यात आली आहे.