- ओमप्रकाश देवकर लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: तालुक्यातील शेती सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचा असलेला कोराडी प्रकल्पाच्या भिंती झाडाझुडपांनी वेढल्या आहेत. भिंतीवरच्या संरक्षण भिंतीची पडझड झालेली आहे. या देखभाल-दुरुस्तीकडे सिंचन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत असून बेजबाबदारपणा उघड होत आहे.तालुक्यातील शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचा असलेला कोराडी प्रकल्प परतीच्या पावसाने आॅक्टोबरच्या शेवटी शंभर टक्के भरला आहे. प्रकल्पाची पाणीसाठा क्षमता १५.१२ दलघमी एवढी आहे. सध्या या प्रकल्पातील पाण्यावर कालव्याद्वारे ३ हजार ७०० हेक्टर एवढे सिंचन करण्यात येते. एवढेच नव्हे तर या जलाशयातून उपसा सिंचनाद्वारे ८०० हेक्टर सिंचन होऊ शकते. या प्रकल्पावर पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून असलेल्या सर्व गावांची तहान हा प्रकल्प भरल्यामुळे भागणार आहे. मात्र हा महत्त्वाचा प्रकल्प असूनही या प्रकल्पाच्या देखभाल व दुरूस्तीकडे सिंचन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने या विभागाचा बेजबाबदारपणा उघड होत आहे. या प्रकल्पाच्या भिंतीवरील संरक्षण भिंतीला तडे गेले असून काही ठिकाणी संरक्षण भिंत कोसळली आहे. याच प्रकल्पाच्या भिंतीवर झाडेझुडपे वाढली असून या झाडाझुडपांनी भिंतीला तडे गेले आहेत. यामुळे या कोराडी प्रकल्पाच्या भिंतीसह संरक्षण भिंतीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकल्पामुळे शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून या प्रकल्पाच्या देखभाल दुरूस्तीकडे सिंचन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. प्रकल्पाच्या सुरक्षिततेचा प्रश्नकोराडी प्रकल्पाच्या भिंतीवर झाडाझुडपांनी वेढा घातला आहे. या झाडांची मुळे भिंतीत खोलवर जात असल्याने या प्रकल्पपाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे सदर झाडे-झुडपे तोडणे आवश्यक आहे. अन्यथा दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासोबतच कोराडी प्रकल्पाच्या भिंतीवरील संरक्षण भिंत अनेक ठिकाणी पडलेली आहे. या भिंतीला अनेक ठिकाणी चिरा गेलेला आहेत. यामुळे कोराडी प्रकल्पाच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या प्रकल्पाच्या देखभाल व दुरुस्ती संदर्भात सविस्तर अंदाजपत्रक तयार करून सादर करण्यात आले आहे. निधी उपलब्ध झाल्यास ही कामे प्रथम प्राधान्याने करण्यात येतील. त्यादृष्टीने प्रशासन तत्पर आहे.-एन .ए .बळी, शाखाधिकारी,सिंचन शाखा मेहकर.