बुलडाणा जिल्हय़ात सिंचनाचा अभाव; रब्बीचा पेरा घटला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:04 AM2017-12-04T00:04:20+5:302017-12-04T00:04:54+5:30
अवर्षण आणि शासनाच्या धोरणाचा विपरीत परिणाम जिल्ह्यातील रब्बी पेर्यावर दिसून येतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीच्या पेर्यात तब्बल २६ हजार ८२६ हेक्टरने घट झाली आहे.
अनिल गवई।
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: अवर्षण आणि शासनाच्या धोरणाचा विपरीत परिणाम जिल्ह्यातील रब्बी पेर्यावर दिसून येतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीच्या पेर्यात तब्बल २६ हजार ८२६ हेक्टरने घट झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या वर्षी १ लाख ४५ हजार ९९0 हेक्टरवर रब्बी पिकाची पेरणी झाली होती. यामध्ये हरभरा पिकाचा पेरा सर्वाधिक होता. दरम्यान, यावर्षी हरभरा पिकाचा पेरा अधिक असला तरी, जिल्ह्यातील रब्बीच्या क्षेत्रफळात तब्बल २६ हजार ८२६ हेक्टरने घट झाल्याचे दिसून येते. नैसर्गिक आपत्ती आणि शेतमालाला मिळणारा भाव यामुळे रब्बीच्या पेर्यात घट झाल्याचे दिसून येते. उत्पादन खर्चापेक्षाही उत्पन्न कमी होत असल्याने, काही शेतकर्यांनी रब्बी पिकाची पेरणी टाळली आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांनी आपली शेती बटाईने दिल्याचीही वस्तुस्थिती आहे.
सन २0१४-१५ आणि २0१५-१६च्या तुलनेत समाधानकारक पावसामुळे गेल्या वर्षी म्हणजेच सन २0१६-१७ मध्ये रब्बीच्या पेर्यात लक्षणीय वाढ झाली होती; परंतु यावर्षी पावसाची अनियमिता, उत्पादनातील तूट आणि शासनाच्या धोरणामुळे रब्बी क्षेत्रात घट झाल्याची ग्रामीण भागात चर्चा आहे.
तथापि, जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली आणि सिंदखेड राजा तालुक्यात सरासरी क्षेत्रापेक्षा रब्बीच्या पेर्यात लक्षणीय वाढ असल्याचे दिसून येते. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात ७४ टक्यांची वाढ असून, चिखली तालुक्यात २ टक्यांची वाढ दिसून येते.
त्याचवेळी सिंदखेड राजामध्ये सरासरी क्षेत्रापेक्षा ३१ टक्के अधिक रब्बीचा पेरा झाला आहे. सरासरी क्षेत्रापेक्षा कमी पेरा शेगाव (२४),
जळगाव जामोद (३२), मोताळा
(३६) आणि नांदुरा (३४) टक्के झाला आहे. तथापि, घाटाखालील तालुक्यांच्या तुलनेत घाटावरील तालुक्यांमध्येच रब्बीचा पेरा अधिक झाल्याचे दिसून येते. खरिपात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकर्यांनी रब्बीच्या पिकांची निगा राखणे गरजेचे आहे.
-