कोरोना मृतांवर अंत्यसंस्कारासाठी सरसावली जिजाऊंची लेक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:37 AM2021-04-28T04:37:54+5:302021-04-28T04:37:54+5:30
कोरोनाची विदारक परिस्थिती पाहता गेल्या वर्षीपासून जयश्री शेळके यांनी दिशा हेल्पलाईन सुरू केली आहे. कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकाला हेल्पलाईन ...
कोरोनाची विदारक परिस्थिती पाहता गेल्या वर्षीपासून जयश्री शेळके यांनी दिशा हेल्पलाईन सुरू केली आहे. कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकाला हेल्पलाईन हरप्रकारे मदत करते. कुणाची जेवणाची सोय नसेल, तर डबा पोहचविणे, दवाखान्याची मदत, औषधी, अंत्यसंस्कार अशी विविध प्रकारे मदत केली जाते. रविवारी मेहकर येथील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. नातेवाईकांनी दिशा हेल्पलाईनकडे मदत मागितली. अवघ्या १० मिनिटात स्वतः जयश्री शेळके टीमसह स्मशानभूमीत पोहचल्या. पार्थिवावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. दिशा हेल्पलाईनच्या मदतीने मृताचे नातेवाईकही भारावले. रविवारी जुनागाव भागात लेकीकडे पाहुणी आलेल्या जळगाव खान्देश येथील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मजुरी करून प्रपंच चालविणाऱ्या जावयाकडे अंत्यसंस्कार करण्याची सोय नव्हती. दिशा हेल्पलाईनकडे संपर्क साधताच तात्काळ मदत करुन महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दिशा हेल्पलाईन ठरतोय आधार
कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. दवाखाने कोरोना रुग्णांनी भरले आहेत. आता तर इतकी भयंकर परिस्थिती आहे की, रुग्णांना बेड शिल्लक नाहीत. रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. दररोज मृतांचा आकडा वाढत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जवळचे नातेवाईकही पुढे येत नाहीत. बऱ्याचदा नगरपालिका, रुग्णालय प्रशासन परस्पर अंत्यसंस्कार करीत आहेत. मन हेलावून टाकणारे हे चित्र आहे. अशावेळी अडचणीत सापडलेल्या नागरिकांना दिशा हेल्पलाईन मोठा आधार ठरत आहे.