इंग्रजकालीन तलावाचे सुशोभिकरण फसले गाळात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 05:48 PM2019-04-29T17:48:47+5:302019-04-29T17:49:05+5:30
बुलडाणा: येथे इंग्रजानी संगम तलाव, तार तलाव, लेंडी तलाव व सरकारी तलाव तयार केलेले आहेत. परंतू सध्या इंग्रजकालीन तलावाचे सुशोभिकरण गाळात फसल्याचे चित्र आहे.
बुलडाणा: येथे इंग्रजानी संगम तलाव, तार तलाव, लेंडी तलाव व सरकारी तलाव तयार केलेले आहेत. परंतू सध्या इंग्रजकालीन तलावाचे सुशोभिकरण गाळात फसल्याचे चित्र आहे. तलावाभोवती असलेल्या काटेरी झुडुपांने तलावाचे सांैदर्यीकरण लपले असून हा ऐतिहासिक वारसा जपण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्याला इंग्रजकालीन तलावाने एक वैभव प्राप्त करून दिले; मात्र जिल्ह्यातील इंग्रजकालीन तलावाची अत्यंत दूरवस्था झाली आहे. बुलडाण्यातील इंग्रजकालीन टीबी हॉस्पीटल समोरील तलावाचे सौंदर्य सध्या काटेरी झुडूपात अकडले असून तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात इंग्रजाच्या काळात अनेक तलाव तयार करण्यात आले होते. इंग्रजांनी १८६७ साली थंड हवेच्या बुलडाणा शहराला जिल्ह्याचा दर्जा प्राप्त करून दिला. त्यावेळी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी शहराच्या चारही बाजुला तलावाची निर्मिती करण्यात आली होती. त्यामध्ये संगम तलाव, तार तलाव, लेंडी तलाव व सरकारी तलाव यांचा समावेश आहे. अनेक वर्ष बुलडाण्याला इंग्रजकालीन संगम तलावातून पाणी पुरवठा करण्यात येत होता. तर लेंडी तलाव व तार तलाव यांचा वापरासाठी व कपडे धुण्यासाठी वापर करण्यात येत होता. परंतु स्वातंत्र्यानंतर या चारही तलावाला अवकळा प्राप्त झाली. नगरपालीकेच्या दुर्लक्षामुळे तार तलाव व लेंडी तलाव नामशेष झाले. जिल्ह्यात प्रसिद्ध असलेला इंग्रजकालीन संगम तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. संगम तालवाचे सौंदर्य सध्या काटेरी झाडात दडले आहे. तलावाला काटेरी झुडपांचा विळखा निर्माण झाला असून, यातील पाणीही हिरवे पडत आहे. त्यामुळे या तलावाच्या काठावरिल झुडूपे काढून तलावाचे सौंदर्यीकरण करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)
तलाव बनला ‘वॉकिंग ट्रॅक’
बुलडाण्यातील टीबी हॉस्पिटल समोर असलेला इंग्रजकालीन तलावाच्या काठाभोवती सध्या वॉकिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. हा तलावावर अनेक जण सकाळी व सायंकाळी वॉकिंग साठी जात आहेत. तर अनेक युवकांसाठी धावपट्टी याठिकाणी तयार झाली आहे.