‘कारल्याला कारले येऊ दे सून बाई...मग जा तुझ्या माहेरा”
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:40 AM2021-09-14T04:40:51+5:302021-09-14T04:40:51+5:30
खरिपाची पेरणी झाल्यानंतर दसरा, दिवाळीपर्यंत खरिपाचे पीक हे पूर्णपणे काढणीला, कापणीला येते आणि साधारणत: कष्टाने पिकवलेल्या या कृषीलक्ष्मीच्या आगमनाने ...
खरिपाची पेरणी झाल्यानंतर दसरा, दिवाळीपर्यंत खरिपाचे पीक हे पूर्णपणे काढणीला, कापणीला येते आणि साधारणत: कष्टाने पिकवलेल्या या कृषीलक्ष्मीच्या आगमनाने शेतकरी आनंदून जातो. विदर्भात साजरा होणारा भुलाबाईचा उत्सव हा नवीन आलेल्या धान्याच्या पूजनासाठी आनंदाने साजरा केला जातो. भुलाबाईच्या उत्सवाची श्रीमंती ही वऱ्हाडात फार जास्त पाहायला मिळते. वऱ्हाडातील ग्रामीण भागात कोजागरी पौर्णिमा ही माळी पौर्णिमा म्हणून शेतकरी कुटुंबांमध्ये दणक्यात साजरी केली जाते. माळी पौर्णिमेचा हा नवीन धान्याच्या स्वागताचा सण भुलाबाईचा उत्सव म्हणून लहान मुली व महिला घरोघरी सामूहिकपणे साजरा करतात. भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून हा सण सुरू होतो. म्हणजेच गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासून ते कोजागरी पौर्णिमेपर्यंत हा सण साजरा होतो.
भुलाबाईंचे गाणे आणि खाऊ ओळखण्याची शर्यत
महिनाभर माहेरी वास्तव्यास आलेल्या भुलाबाईंच्या स्थापनेपासून तर विसर्जनापर्यंत लहानग्यांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येत असे. रात्रभर भुलाबाईंची कौतुक करणारी गाणी आणि नंतर प्रसाद म्हणून ठेवलेला खाऊ ओखळण्याची पद्धत चिमुकल्यांचा विरुंगळा करण्याबरोबरच त्यांची कृषी संस्कृतीशी नाळ जोडून ठेवत असे. मात्र, हे चित्र काही वर्षांपासून लोप पावत आहे.
काहीसा पडला विसर
आधुनिकीकरणामुळे कृषी संस्कृतीतील वेगवेगळ्या परंपरा आता लोप पावत आहेत. त्यामध्ये भुलाबाई हाही एक उत्सव आहे. पूर्वीच्या काळी घरातील थोरा-मोठ्यांपासून तर अगदी लहानग्यापर्यंत हा उत्सव साजरा केला जात असे. मात्र, आता हा उत्सव काहीच घरी साजरा होत असल्याने नव्या पिढीला याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.