...या लाइफस्टाईलचं होतंय सध्या कौतुक; शेतात घरे करून राहणारे नागरिक ठरताहेत सुरक्षित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 04:37 PM2020-04-04T16:37:46+5:302020-04-04T16:38:34+5:30
घाटाखाली खामगाव, नांदुरा, आणि मलकापूर तालुक्यात अनेक वर्षांपासून शेतातच घरे करून राहण्याची एक पध्दत आहे.
-देवेंद्र ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स सध्या महत्त्वाचे मानले जात आहे. एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत प्रशासनाच्या सूचना आहेत. या सगळ्या प्रक्रियेत सध्या अत्यंत सुरक्षित आहेत, ती शेतात घरं करुन राहणारी माणसे! घाटाखाली खामगाव, नांदुरा, आणि मलकापूर तालुक्यात अनेक वर्षांपासून शेतातच घरे करून राहण्याची एक पध्दत आहे. सध्या या लाइफस्टाईलचं प्रचंड कौतुक होत आहे.
कोरणा व्हायरसने संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले आहे. भारतालाही याचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला आहे. अगदी बुलढाणा जिल्ह्याचा विचार करायचा झाल्यास दिवसेंदिवस संशयित रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत आहे. देशात लॉकडाऊन सुरू आहे. काम नसताना घराबाहेर फिरू नये अशा सूचना वारंवार देण्यात येत आहेत. कोरोनाला हरवायचे असेल तर सध्या सोशल डिस्टन्सिंग हाच सर्वात मोठा उपाय असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे इतक्यात देण्यात येत असले, तरी अनेकांनी या सोशल डिस्टन्सिंगला आपली संस्कृतीच बनवली असल्याचे जिल्ह्यात दिसून येते. खामगाव, मलकापूर, आणि नांदुरा तालुक्यात गत अनेक दशकांपासून शेतात घरे करून राहण्याची एक पद्धत आहे. स्वत:हूनच लावून घेतलेली ही सवय सध्याच्या वातावरणात सुरक्षितता प्रदान करणारी ठरू लागली आहे. खामगाव तालुक्यात हिवरा, मांडका, नांदुरा तालुक्यात पोटळी, मलकापूर तालुक्यात घिरणी, बेलाड आदी गावांमध्ये सुमारे निम्मे लोक शेतातच घर करून राहत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या नागरिकांची ही लाईफस्टाईल सध्याच्या काळात अत्यंत सुरक्षित असल्याचे दिसून येते.
अर्थकारणाशी जोडला संबंध!
शेतात घरे करून राहिल्यामुळे गावातील लोकांचा संबंध येत नाही. परिणामी गावातील रिकामटेकड्या गप्पांमध्ये रमणे नाही. शिवाय आसपास दुकाने नसल्यामुळे मुलांना तंबाखूसारखी व्यसने जडत नाहीत. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत शेतातील कामातच लक्ष असते. पर्यायाने शु्ल्लक बाबींवरील खर्च टाळल्या जातो. दिवसभर शेतात राबत असल्याने उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने याची मदत होते. वातावरण शुध्द असल्याने आरोग्यही चांगले राहत असल्याचे नागरिक सांगतात.
माझ्या आजोबांपासून शेतातच राहण्याची पध्दत आहे. आमच्या गावातील इतर निम्मे लोकांची घरेसुध्दा शेतातच आहेत. शुद्ध हवा, निसर्गरम्य वातावरण यामुळे प्रसन्नतेचा अनुभव येतो.
वसंता चित्रंग
बेलाड, ता. मलकापूर