बुलडाणा जिल्ह्यात २१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 05:24 PM2020-07-22T17:24:29+5:302020-07-22T17:24:37+5:30
शनिवार व रविवारी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार असून संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने लागू केलेले लॉकडाऊन आणखी २१ आॅगस्टपर्यंत वाढविले आहे. प्रत्येक शनिवार व रविवारी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार असून संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
प्रत्येक शनिवार व रविवार या दिवशी औषधालय, दवाखाने व दुध वितरण, संकलन वगळून इतर सर्व बाबींवर बंदी घालण्यात आली असून या दोन्ही दिवशी संचारबंदी लागू राहणार आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी सुमन चंद्रा यांनी मंगळवारी दिले आहेत.
तसेच सोमवार ते शुक्रवार या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात सर्व उद्योग, व्यवसाय आदी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू असणार आहेत. त्याच दिवशी दुपारी ३ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत दुध, वर्तमानपत्र वितरण आदी वगळता संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत कडक कर्फ्यु लागू असणार आहे. तसेच १ जुलैच्या आदेशामध्ये ज्या बाबी बंद राहतील, असे नमूद केले आहे. त्या बाबी ३१ जुलै २०२० पर्यंत तशाच बंद राहतील. दवाखाने, औषधालय, वैद्यकीय तसेच अत्यंत आवश्यक मानवी कामासाठी बाहेर पडणारे नागरिक, आंतर जिल्हा वाहतुक / पासधारक वाहने व माल वाहतुक सुरू राहील. शहराच्या हद्दीबाहेरील सर्व पेट्रोलपंप २४ तास सुरू राहणार आहेत.
या काळात अत्यावश्यक असणाऱ्यांनीच बाहेर पडावे. विनाकारण कुणीही बाहेर फिरू नये. सर्वांनी चेहºयावर मास्क किंवा स्वच्छ रूमाल वापरावा. चेहºयावर काही बांधलेले नसल्यास दंड आकारण्यात येईल. अत्यावश्यक सेवा पुरविणाºया व्यक्तींना आवश्यकतेनुसार संचार करण्यास मुभा राहणार आहे.
या गोष्टी बंदच राहतील?
शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास
रेल्वेची नियमित वाहतूक
सिनेमाघरे, जिम, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, थिएटर, बार आणि आॅडिटोरियम, कार्यक्रमाचे सभागृह हॉल आणि तत्सम ठिकाणे.
कोणत्याही स्वरूपाचा सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, अभ्यासविषयक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम
विविध धर्मीयांची प्रार्थनास्थळे
शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट तसंच अन्य हॉस्पिटॅलिटी केंद्र
सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन कोणताही कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी नाही.