लोणार संवर्धन व संरक्षण समितीची एक वर्षानंतर बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 11:01 AM2020-06-30T11:01:23+5:302020-06-30T11:01:28+5:30
मेहकरचे आ. डॉ. संजय रायमुलकर हे या समितीचे अध्यक्ष असून या बैठकीत सरोवर विकास आराखड्याच्या संदर्भातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: नागपूर खंडपिठाच्या आदेशानुसार गठीत करण्यात आलेल्या लोणार संवर्धन व संरक्षण समितीची जवळपास एक वर्षानंतर लोणारमध्ये सहा जुलै रोजी बैठक होत आहे. दरम्यान, सात जुलै रोजी नागपूर खंडपीठात अनुषंगीक याचिकेच्या संदर्भाने सुनावणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. मेहकरचे आ. डॉ. संजय रायमुलकर हे या समितीचे अध्यक्ष असून या बैठकीत सरोवर विकास आराखड्याच्या संदर्भातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी पाच जुलै आणि १९ आॅगस्ट रोजी लोणार सरोवर संवर्धन व संरक्षण समितीची बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीनंतर राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या. त्यामुळे पुढील काळात ही बैठक होऊ शकली नव्हती तर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लोणार सरोवर क्षती प्रतीबंध तथा संवर्धन करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या या समितीचे अध्यक्ष असलेले आ. डॉ. संजय रायमुलकर यांचाच अपघात झाल्यामुळे समितीच्या पुढील बैठका होऊ शकल्या नव्हत्या. त्यानंतर कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन सुरू झाले होते.
या सर्व पार्श्वभूमीवर आता सहा जुलै रोजी ही बैठक होत आहे. या बैठकीत प्रामुख्याने सरोवरातील वेडी बाभूळ वनस्पती निर्मूलन, पालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, झोपडपट्टी पूनर्वसन, लोणार सरोवरातील मंदिर व परिसरातील कामे तथा मध्यंतरी झालेल्या सुनावणी दरम्यान नागपूर खंडपीठाने दिलेल्या जवळपास १४ मुद्द्यांवरील आदेशाच्या अंमलबजावणीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
संपूर्ण सरोवर व लोणार परिसराच्या विकास आराखड्याचे डॉक्युमेंटेशनाची स्थिती, भोपाळ येथील स्कूल आॅफ मॅनेजमेंट अॅन्ड आॅर्कियालॉजीला लोणार सरोवर एकात्मिक विकास आराखडा बनविण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. या स्कूलच्या पथकाने गेल्या वर्षी दोनदा लोणार सरोवरास भेट देवून पाहणी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनीही महसूल, पोलिस, वन्यजीव, पालिका, बांधकाम, पुरातत्व विभाग व संबंधीत यंत्रणेला लोणारचे व्हीजन डॉक्युमेंटेशन करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यासंदर्भातील कामास मधल्या काळात प्रारंभही झाला होता.
(प्रतिनिधी)