लोणार सरोवर संवर्धन; आता सात जुलै रोजी सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 12:30 PM2020-06-29T12:30:16+5:302020-06-29T12:31:33+5:30
नागपूर खंडपीठात दाखल याचीकेवर २९ जून ऐवजी आता सात जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
बुलडाणा: लोणार सरोवर विकास व संवर्धनासंदर्भात नागपूर खंडपीठात दाखल याचीकेवर २९ जून ऐवजी आता सात जुलै रोजी सुनावणी होणार आहे. याच सुनावनी दरम्यान सरोवरातील पाणी गुलाबी झाल्याच्या संदर्भातील गुपीत समोर येण्याची शक्यता आहे. नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्थेला (निरी) आणखी दोन आठवड्यांचा संशोधनासाठी अवधी हवा आहे. अॅडव्हान्स पद्धतीने सरोवरातील पाण्याच्या रंग बदलाचा अभ्यास करून निष्कर्ष काढण्यासाठी संस्थेला हा अवधी हवा असल्याची माहिती आहे. दुसरीकडे पुण्यातील आगरकर संस्थाही रंग बदलाच्या कारणांच्या निकट पोहोचली असल्याचे सुत्रांनी सांगितले.
लोणार सरोवरातील पाण्याचा रंग नऊ जून रोजी गुलाबी झाला असल्याचे समोर आले होते. त्यानंतर राज्यासह देशात हा विषय कुतूहल व जिज्ञासा वाढविणारा ठरला होता. त्यातच नागपूर खंडपीठात लोणार सरोवर विकास व संवर्धनाच्या अनुषंगाने दाखल याचिकेवर याच कालावधीदरम्यान सुनावनी होवून पाण्याचा रंग बदलण्याच्या कारणांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुषंगाने नागपूर येथील निरीच्या तीन सदस्यीय पथकाने १४ जून रोजी सरोवराच्या पाण्यात उतरून सहा ठिकाणचे नमूने गोळा केले होते. पुणे येथील आगरकर संशोधन संस्थेनेही पाण्याच्या रंग बदलासंदर्भात संशोधन सुरू केले होते. निरी संस्थेने सरोवरातील पाण्याप्रमाणे कल्चर डेव्हलप करत बारकाईने त्याचा अभ्यास सुरू केला आहे. त्यामुळे या संस्थेला आणखी दोन आठवड्यांचा अवधी प्रत्यक्ष निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाटी हवा आहे. त्यादृष्टीने निरी नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दुसरीकडे पुणे येथील आगरकर संशोधन संस्थाही प्रत्यक्ष निष्कर्षाजवळ आली असल्याची माहिती आहे. प्रसंगी एका आठवड्यात तेही याचे नेमके कारण स्पष्ट करू शकतात, असे सुत्रांचे म्हणणे आहे.