लोणार सरोवर विकास आराखड्यास गती मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:06 AM2021-02-28T05:06:32+5:302021-02-28T05:06:32+5:30
बुलडाणा : राज्याच्या गतवर्षीच्या अर्थसंकल्पात पर्यटन विकासासाठी करण्यात आलेल्या एक हजार ४०० कोटी रुपयांच्या तरतुदीअंतर्गत विशेष बाब म्हणून लोणार ...
बुलडाणा : राज्याच्या गतवर्षीच्या अर्थसंकल्पात पर्यटन विकासासाठी करण्यात आलेल्या एक हजार ४०० कोटी रुपयांच्या तरतुदीअंतर्गत विशेष बाब म्हणून लोणार सरोवर विकास आराखड्याचा समावेश करण्यात आला होता. मात्र नंतर कोरोनाचा फटका बसल्यामुळे अपेक्षित गती या विकास आराखड्याने पकडली नव्हती. परिणामी, १ मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडून लोणार सरोवर विकासासाठी कितपत तरतूद होते याकडे सध्या जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. गेल्या वर्षी राज्याच्या अर्थसंकल्पात ८३ क्रमांकाच्या मुद्द्यामध्ये लोणार सरोवर विकास आराखड्याचा समावेश करण्यात आला होता. परिणामस्वरूप आता लोणार सरोवर व परिसर विकासासाठी निधीची तरतूद करण्याचा मार्ग गेल्या वर्षीच मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या ८ मार्च रोजी विधिमंडळात सादर करण्यात येणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात लोणार सरोवर विकासासाठी नेमकी किती तरतूद केली जाते याकडे सध्या लक्ष लागून आहे. त्यातच फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोणार सरोवरास भेट देऊन पाहणी केली होती. त्या वेळी लोणार सरोवर विकास आराखडा हा २०५ कोटी रुपयांचा असल्याचे स्पष्ट झाले होते. यातील कामांचा प्राधान्यक्रम ठरवून ही कामे करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी संकेत देत थेट सीएमओ कार्यालयांतर्गत विकास आराखड्याची कामे करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले होते.
त्याची पहिली झलक ‘लोणार सरोवर विकास आराखडा अंमलबजावणी समिती’ आणि ‘लोणार विकास आराखडा संनियंत्रण समिती’ स्थापन केल्यामुळे मिळाली आहे. नागपूर खंडपीठात दाखल याचिकेअंतर्गत खंडपीठाने दिलेल्या दिशानिर्देशानंतर प्रशासकीय यंत्रणा आता हालत असून त्या अनुषंगाने या समित्या आता सक्रिय होत आहेत. मात्र त्यांचा केवळ बैठकांचाच सोपस्कार राहू नये म्हणजे झाले. २०५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांतर्गत १०७ कोटी रुपयांची कामे ही आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात प्राधान्य क्रमाने करण्यात येणार आहेत.
--कामे त्वरित होण्यासाठी प्रयत्न--
लोणार सरोवर व परिसर विकासाची कामे प्राधान्यक्रम ठरवून करण्यास आमचे प्राधान्य आहे. राज्याच्या अर्थसंकल्पातही अ दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या लोणारच्या विकासासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू असल्याचे मेहकरचे आ. डॉ. संजय रायमुलकर यांनी स्पष्ट केले.
--संशोधकांसाठी असावी विशेष सुविधा--
‘अ’ दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या लोणार येथे भूगर्भ, रसायन शास्त्र, खगोलीय अभ्यासासाठी देश-विदेशातून संशोधक, अभ्यासक येतात. विशेष म्हणजे इन्फ्रारेड किरणांच्या माध्यमातून येथील खडक, माती व अन्य घटकांचाही परदेशी शास्त्रज्ञ अभ्यास करतात. त्यांच्यासाठी येथे आधुनिक सुविधा व साधने उपलब्ध व्हावीत यासाठीही आराखड्यांतर्गत प्रयत्न होणे गरजेेचे आहे.