मतदार आधार कार्डशी जोडण्याच्या मोहिमेला अत्यल्प प्रतिसाद
By admin | Published: April 27, 2015 01:33 AM2015-04-27T01:33:29+5:302015-04-27T01:33:29+5:30
बोगस मतदार शोधमोहीम ; राज्यात तीन लाख मतदारांना आधार.
ब्रम्हानंद जाधव / मेहकर (जि. बुलडाणा): बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार यादीला आधार कार्ड जोडण्याची धडक मोहीम मागील महिन्यापासून हाती घेतली आहे; परंतु आतापर्यंत राज्यातील सुमारे ३ लाख १0 हजार मतदारांनीच आधार लिंकिंग केले आहे. त्यामुळे मतदार यादी आधार कार्डशी जोडण्याच्या या मोहिमेला मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद दिसून येत आहे.
राज्यात ८ कोटी ३५ लाख ३४ हजार ८८0 मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये ४ कोटी ४0 लाख ७७ हजार पुरुष, ३ कोटी ९४ लाख ५६ हजार २७१ महिला व १ हजार ३८ इतर मतदारांचा समावेश आहे. राज्यात ८ कोटी ७ हजार लोक १८ वर्षांवरील आहेत. त्यामुळे बनावट मतदार शोधून अचूक मतदार यादी बनविण्याच्या दृष्टिकोनातून मतदार यादीला आधार कार्डाची जोड दिली जात आहे. मतदान कार्ड आणि आधार कार्डमधील माहितीची सांगड घालावी, याबाबत राज्य व केंद्र सरकाच्यावतीने देशभरातील मतदारांची लिंक आधार कार्डशी जोडण्याची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे बोगस मतदार समोर येणार आहेत. मतदारांचे छायाचित्र, मतदार ओळखपत्रातील माहिती व आधार कार्डमधील माहिती यांची सांगड घालणे व ती माहिती प्रमाणित करण्यासाठी मतदरांची लिंक आधार कार्डशी जोडण्याची मोहीम राज्यभर युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. बोगस मतदान कार्डला आळा बसविणे, एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदणी असलेल्या मतदारांचे अन्य ठिकाणी असलेले नाव वगळणे, मतदार यादीमधील चुका, मतदार ओळखपत्रामधील दुरुस्त्या आदी सुधारणा या लिंकमुळे शक्य होणार आहे. राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणीकरण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणार्या या मोहिमेला ऑनलाइनची जोड देण्यात आली आहे.