लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपुर : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत मागेल त्याला शेततळे योजना राबविण्यात आली. मात्र संग्रामपुर तालुक्यात या योजनेचा फज्जा उडाला असुन नको त्या ठिकाणी शेततळे खोदण्यात आल्याचे दिसून येत आहे.कामाचे निकष व मापदंड वेशीला टांगुन तालुका कृषी विभागाने महत्वकांक्षी योजनेला हरताळ फासला. तालुक्यात सन २०१५-१६ ते २०१८-१९ या चार आर्थिक वर्षात ४१९ शेततळे खोदले. यावर १ कोटी ९७ लाख २८ हजार ५६९ रूपये खर्च करण्यात आला. मात्र याचा उपयोग होतांना दिसत नाही. ४ वर्षांपासून कोट्यवधी रूपये खर्च होऊनसुध्दा तालुका पाणिदार झाला नाही. दुष्काळ मुक्तीसाठी शासनाने अस्तित्वात आणलेली योजना प्रशासनाच्या कागदी घोड्यांमुळे कुचकामी ठरली. १३ योजनांच्या एकत्रीकरणातून अभियान ५ डिसेंबर २०१४ च्या शासन निर्णयानुसार सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र- २०१९ या संकल्पनेतून जलयुक्त शिवार अभियान ही योजना पुढे आली. १३ शासकीय योजनांचे एकात्मीकरण असलेल्या या योजनेत कामे आहेत. साखळी बंधाऱ्यासह नाला खोलीकरण व रुंदीकरण, पाणलोट विकास, जुन्या जलसंरचनांचे पुनरुज्जीवन, लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर) कामांची दुरुस्ती, नूतनीकरण व पुनर्स्थापना, नव्या-जुन्या सर्व प्रकारच्या छोट्या तलावांमधून गाळ काढणे, मध्यम व मोठ्या प्रकल्पांची सिंचन क्षमता प्रत्यक्ष वापरात येण्याकरिता उपाययोजना करणे, छोटे नाले, ओढे, जोड प्रकल्प, विहीर व बोअरवेल यांचे पुनरुज्जीवन, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे बळकटीकरण, पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण आणि कालवा दुरुस्ती ही कामे एकात्मिक पद्धतीने होणे अपेक्षित होते. परंतु संग्रामपुर तालुक्यात ही कामे खरंच या पद्धतीने झाली का असा प्रश्न कायम आहे. शेततळे खोदले परंतु बहुतांश ठिकाणी कामे संशयाच्या भोवºयात सापडली आहेत. त्यामुळे जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाने जलयुक्त शिवार अंतर्गत झालेल्या या कामांची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.कागदोपत्री कामे झाली पूर्ण!कृषी विभागाने संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा खुर्द, कवठळ, बोडखा, कुंभारखेड, कोद्री, काकोडा, तामगाव, नेकनामपुर, वरवट बकाल, काथरगाव, उकळी बु., वानखेड, चांगेफळ, चोंडी, भिलखेड, खेळदळवी, पातुर्डा आदी शिवारांमध्ये मोठ्या प्रमाणावर खड्डे खोदुन काम केल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे, असा आरोप शेतकरी करीत आहेत.
संग्रामपूर तालुक्यातील जलसंधारणाच्या कामाची दखल घेण्यात येईल. याबाबत निश्चित चौकशी करण्यात येईल.- नरेंद्र नाईक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी